अयोध्येतून कुणीही उपाशी जाणार नाही; भाविकांसाठी ४० ते ४५ अन्नछत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 06:58 PM2024-01-25T18:58:16+5:302024-01-25T19:00:33+5:30
अयोध्येत २३ जानेवारीला पाच लाखहून अधिक भक्तांनी प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेतले.
अयोध्या - अयोध्येतील राम मंदिरात रामललांची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर पहिल्याच दिवशी राम भक्तांकडून ३.१७ कोटी रुपयांचे दानधर्म करण्यात आले. राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे ट्रस्टी अनिल मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी १० दान काउंटर उघडण्यात आले होते. 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा समारंभानंतर, भक्तांनी दान काउंटर आणि ऑनलाइन देणगीच्या स्वरुपात ३.१७ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. तर, पहिल्याच दिवशी ५ लाख भाविकांनी रामललाचे दर्शन घेतले असून अद्यापही मोठी गर्दी आहे. आता, या भाविकांसाठी अन्नछत्रही सुरू करण्यात आलं आहे.
अयोध्येत २३ जानेवारीला पाच लाखहून अधिक भक्तांनी प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेतले. तर बुधवारी रात्री १० वाजेपर्यंत २.५ लाखहून अधिक भाविकांनी मंदिरात दर्शन घेतले. बुधवारी मिळालेल्या देणगीचा खुलासा पुढच्या दिवशी केला जाईल. तसेच भाविकांना चांगल्या पद्धतीने दर्शन घेता यावे, यासाठी प्रशासनासोबत चर्चा करून व्यवस्था केली जात आहे. त्यासोबतच मंदिर ट्रस्टकडून भाविकांना जेवणाचीही सोय केली जात आहे.
राम मंदिर ट्रस्टकडून अयोध्येत येणाऱ्या भाविकांसाठी मोठं अन्नदान सुरू आहे. अयोध्येतील भाविकांना जेवणासाठी ४० ते ४५ ठिकाणी भंडारा व अन्नछत्र सुरू केलं आहे. प्रत्येक अर्धा किलो मीटरवर हे अन्नछत्र कार्यरत असून मंदिर ट्रस्टच्यावतीने हे चालवलं जात आहे. अयोध्येत येणारा कुठलाही भाविक उपाशी राहता कामा नये, हाच या अन्नछत्राचा उद्देश असल्याचं मंदिर ट्रस्टने म्हटले आहे.
राम मंदिर ट्रस्टकडून चालवण्यात येणाऱ्या या भंडाऱ्यात दक्षिण भारतीय जेवणापासून पूर्वांचल भागातील जेवण असणार आहे. तसेच, पश्चिमांच्छपासून उत्तरांचलकडील पदार्थांची चव भाविकांना घेता येणार आहे. येथील भंडाऱ्याच्या नियोजनासाठी गोदामात गुळ, तूप, बाजरी, गहू, दाळ, राईस यांसह आवश्यक ती सर्व साधनसामुग्री उपलब्ध आहे. गोदामात पाण्याच्या बॉटल ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने त्या बाहेर ठेवण्यात आल्या आहेत. येथील भंडाऱ्यातील स्वयंपाक घरात हजारो लोकं काम करत आहेत, अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय सचिव यांनी दिली.
सर्वात मोठा भंडारा कारसेवा पूरम येथे सुरू आहे. विश्व हिंदू परिषद आणि आरएसएसचे भोलेंद्र सिंह यांच्या मतानुसार येथे दररोज २००० भाविक अन्नछत्रात जेवण करतात. येथील दक्षिण भारतीय आणि उत्तर भारतीय जेवण बनवलं जातं.