लाखो भक्तांना अयोध्येत भोजनदान; हजारोंची निवासाची सोय, ४० ठिकाणी अन्नछत्र

By यदू जोशी | Published: December 28, 2023 05:33 AM2023-12-28T05:33:30+5:302023-12-28T05:33:59+5:30

२८ फेब्रुवारीपर्यंत चालणार उपक्रम; ४५ एकरच्या परिसरात तीर्थक्षेत्रपुरम

offering food to lakhs of devotees in ayodhya accommodation for thousands food shelters at 40 places | लाखो भक्तांना अयोध्येत भोजनदान; हजारोंची निवासाची सोय, ४० ठिकाणी अन्नछत्र

लाखो भक्तांना अयोध्येत भोजनदान; हजारोंची निवासाची सोय, ४० ठिकाणी अन्नछत्र

यदु जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क, अयोध्याMarathi News ): प्रभू श्री राम मंदिराच्या उभारणीला आलेला वेग आणि २२ जानेवारीच्या मुख्य कार्यक्रमाचे लागलेले वेध असे वातावरण अयोध्येत असताना अन्नदानाचा विक्रमही या नगरीत होणार आहे. 

प्रभू श्री रामाच्या दर्शनासाठी येणाऱ्यांची अयोध्येत सोय काय असा अनेकांना प्रश्न होता. त्याचीही सोय न्यासाने केली आहे. २८ फेब्रुवारीपर्यंत श्री रामलल्लांच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भक्तांच्या निवास, भोजनाचा  अनोखा यज्ञ श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र या ट्रस्टच्या वतीने चालविला जाणार आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशभरातून येणाऱ्या संतमहंतांच्या निवास-भोजनाची व्यवस्था या तीर्थक्षेत्रपुरममध्ये असेल. २६ जानेवारीपासून भक्तांसाठी हा परिसर उपलब्ध असेल. संतमहंत व भक्तांसाठीची निवास व्यवस्था सारखीच आहे. टिनाच्या खोल्या आणि प्रत्येक खोलीत तीन बेड तसेच आतमध्येच स्वच्छतागृह अशी रचना आहे. 

खास भेट येत आहे

उत्तर प्रदेशातील जनकपूर हे प्रभू रामाचे सासर. सीतामातेचे माहेर. तेथील रामजानकी मंदिर व स्थानिक भक्तमंडळींकडून आपल्या लाडक्या जावयासाठी खास भेटवस्तू पाठविण्यात येणार आहेत. अयोध्येच्या सीमेवर थांबून तेथून मिरवणुकीने या वस्तू ट्रस्टच्या स्वाधीन केल्या जातील.

किमान एक महिना नि:शुल्क सुविधा  

या परिसराची व्यवस्था बघत आहेत, पूर्व उत्तर प्रदेशचे विश्व हिंदू परिषदेचे संघटन मंत्री गजेंद्र सिंह. तीर्थक्षेत्रपुरमच्या उभारणीसाठी त्यांनी ऑगस्टपासून स्वत:ला वाहून घेतले आहे. शेकडो मजूर येथे काम करत आहेत. भाविकांना सुरुवातीला एक महिना तरी नि:शुल्क सोयीसुविधा दिली जाणार आहे.  

अन्नछत्रात कोणते पदार्थ?  

तीर्थक्षेत्रपुरममध्ये पाच अन्नछत्र आहेत. याशिवाय अयोध्येत विविध ठिकाणी ३५ अन्नछत्र उघडण्यात येणार आहेत. डाळ, भात, भाजी, पुरी/पोळीचे जेवण दिले जाईल. याशिवाय तीर्थक्षेत्रपुरम असो की बाहेरची अन्नछत्रे तेथे स्वेच्छेने मिठाई आदींचे दान करता येणार आहे. विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय मंत्री राजेंद्रसिंह पंकज यांच्याकडे अन्नछत्रांची मुख्य जबाबदारी आहे.  

दानासाठी सरसावले हजारो हात  

कारसेवकपूरमध्ये व्यवस्थापक असलेले शिवदास सिंग यांनी सांगितले की, देशभरातील हजारो भक्त, विविध मठ, मंदिरांकडून अन्नछत्रांसाठी मदत सुरू झाली आहे. आसाममधून चहा येतोय, छत्तीसगड हे प्रभू रामाचे आजोळ, तेथून तीनशे टन तांदूळ येतोय. मध्य प्रदेश, पंजाबमधून गहू येणे सुरू झाले आहे.  

सर्व हॉटेल्स बुक  

अयोध्येत आतापासूनच सर्व हॉटेल्स बुक झाले आहेत. त्यामुळे अनेकांच्या निवासाची व्यवस्था होत नाही. उत्तर प्रदेश सरकारने अधिकारी कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी अनेक हॉटेल्समध्ये बुकिंग केले आहे. साधारणत: २६ जानेवारी पासून भक्तांसाठी भव्य राम मंदिर खुले करण्यात येईल. तर निवास व्यवस्थेचा प्रश्न अधिकच गंभीर होईल. या पार्श्वभूमीवर श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट भक्तांसाठी धावून आला आहे.

 

Web Title: offering food to lakhs of devotees in ayodhya accommodation for thousands food shelters at 40 places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.