ऑनलाइन केक मागवला पण OTP देणे पडले महागात; खाते झाले रिकामे, नेमकं झालं काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2024 13:55 IST2024-04-27T13:55:36+5:302024-04-27T13:55:57+5:30
Cyber Crime: दिवसेंदिवस सायबर क्राईमच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.

ऑनलाइन केक मागवला पण OTP देणे पडले महागात; खाते झाले रिकामे, नेमकं झालं काय?
दिवसेंदिवस सायबर क्राईमच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. आता वाढदिवसाला ऑनलाइन केक मागवला असता बँक खाते खाली झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील कानपूर येथे ही घटना घडली. इथे महिलेने ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून केक मागवला होता. त्यानंतर केकची ऑर्डर पूर्ण करण्यासाठी तिला ओटीपी विचारण्यात आला. ओटीपी मागण्यासाठी एक कॉल आला पण तिने ओटीपी सांगताच खात्यातील सर्व रक्कम उडाली. खरे तर संबंधित महिलेच्या खात्यातून एक लाख रूपये कापले गेले. ही बाब समजताच महिलेने पोलिसांकडे दाद मागितली.
नीतू श्रीवास्तव असे पीडित महिलेचे नाव आहे. नीतू यांच्या मुलाचा वाढदिवस होता त्यासाठी त्यांनी ऑनलाइन केकची ऑर्डर दिली. केकसाठी लागणारे पैसे देखील त्यांनी दिले होते. पण त्यानंतर काही वेळातच त्यांच्या फोनवर एक ओटीपी आला. मग या ओटीपीसाठी एक अनोळखी नंबरवरून कॉल आला अन् ओटीपी देताच खात्यातील एक लाख रूपये गायब झाले.
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीतू या महिलेला एक फोन आला अन् ओटीपी देताच खात्यातील रक्कम गायब झाली. संबंधित महिलेने ऑर्डर कन्फर्म करण्याच्या हेतून ओटीपी दिला असल्याचे सांगितले. ओटीपी दिल्यानंतर समोरच्या व्यक्तीने लगेच फोन ठेवला. मग काही वेळातच नीतू यांच्या फोनवर एक दुसरा मेसेज आला जो पाहून त्यांना धक्काच बसला.
OTP देणे पडले महागात
दरम्यान, आपल्या बँक खात्यातून एक लाख रूपये उडाले असल्याची खात्री नीतू यांना पटली. तेव्हा त्यांना आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आले. यानंतर नीतू यांनी ऑनलाइन केक बुकिंग कंपनीला फोन करून तक्रार दिली. पण कंपनीच्या कस्टमर केअरने नीतू यांना सांगितले की, त्यांच्या बाजूने असा कोणताही कॉल किंवा मेसेज आलेला नाही, त्यानंतर घाबरलेल्या नीतू यांनी स्थानिक चकेरी पोलीस स्टेशन गाठले आणि पोलिसांना संपूर्ण प्रकार सांगितला. नीतू यांनी न्यायासाठी पोलिसांकडे दाद मागितली असून, पोलिसांनी त्यांना मदतीचे आश्वासन दिले आहे.