मुख्यमंत्री योगींच्या 'गिधाड, डुक्कर' विधानावरून विरोधक भडकले, म्हणाले…
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 19:49 IST2025-02-24T19:48:52+5:302025-02-24T19:49:34+5:30
योगी म्हणाले, कुंभमेळ्यात ज्यांनी जे शोधले, त्यांना ते मिळाले. गिधाडांना मृतदेह दिसले. डुकरांना घाण दिसली, संवेदनशील लोकांना सुंदर चित्र बघायला मिळाले. सज्जनांना सज्जनता दिसली, व्यापाऱ्यांना धंदा दिसला, भाविकांना स्वच्छ व्यवस्था दिसली. ज्यांची नियत आणि दृष्टी जशी होती, त्यांना ते बघायला मिळाले.

मुख्यमंत्री योगींच्या 'गिधाड, डुक्कर' विधानावरून विरोधक भडकले, म्हणाले…
उत्तर प्रदेशते मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कुंभमेळ्यावर टीका करणाऱ्या विरोधकांवर थेट विधानसभेतच जोरदार हल्ला चढवला. योगी म्हणाले, कुंभमेळ्यात ज्यांनी जे शोधले, त्यांना ते मिळाले. गिधाडांना मृतदेह दिसले. डुकरांना घाण दिसली, संवेदनशील लोकांना सुंदर चित्र बघायला मिळाले. सज्जनांना सज्जनता दिसली, व्यापाऱ्यांना धंदा दिसला, भाविकांना स्वच्छ व्यवस्था दिसली. ज्यांची नियत आणि दृष्टी जशी होती, त्यांना ते बघायला मिळाले. यानंतर आता मुख्यमंत्री योगींच्या या विधानावरून समाजवादी पक्षाचे नेते भडकले आहेत.
यासंदर्भात विधानसभेत बोलताना विरोधी पक्ष नेते तथा समाजवादी पक्षाचे वरिष्ठ नेते माता प्रसाद पांडे यांनी, "ते (योगी आदित्यनाथ) भानावर नाहीत, असे म्हटले आहे. सपा नेते म्हणाले, अशी भाषा वापरत आहेत, आश्चर्यकारक आहे. काय बोलावे. त्यांची भाषा बिघडली आहे. याशिवाय सपा आमदार रविदास मेहरोत्रा यांनी सरकारची तुलना गिधाड आणि डुकरांशी केली. ते म्हणाले, आम्ही धर्माला मानतो आणि भाजपवाले पाखंड करतात.
दरम्यान, मैनपुरीचे माजी खासदार आणि सपा आमदार तेज प्रताप यादव म्हणाले, सनातनच्या आडून आपले अपयश लपवण्याचा प्रयत्न करतात. एवढी वाईट भाषा देशातील कुठल्याही मुख्यमंत्र्याची नाही. काय भाषा बोलतात मुख्यमंत्री योगी.
आणखी काय म्हणाले होते मुख्यमंत्री योगी? -
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ विरोधकांना उद्देशून म्हणाले होते, "तुम्ही महाकुंभसंदर्भात म्हणालात की एका विशिष्ट्य जातीच्या व्यक्तीला महाकुंभामध्ये जाण्यापासून रोखण्यात आले. आम्ही सांगितलं होते, जे लोक सद्भावनेने जात असतील ते जाऊ शकतात. मात्र जर कुणी दुर्भावनेने जात असेल, तर तो अडचणीत येईल. आम्ही लोकांच्या धार्मिक भावनांशी खेळ होऊ दिला नाही. समाजवादी पक्ष सत्तेत असताना त्यांच्या मुख्यमंत्र्याकडे कुंभचे व्यवस्थापन करण्यासाठी वेळ नव्हता. त्यामुळे त्यांनी एका बिगर-सनातनी व्यक्तीला कुंभमेळ्याचे प्रभारी बनवले होते.
"समाजवादी पक्षाचे लोक महाकुंभवर सातत्याने टीका करत असतात. या लोकांची मानसिकता जगजाहीर आहे. त्यांना प्रत्येक गोष्टीचा विरोध करायचा असतो. हे वर्ष भारताच्या संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष आहे. पण समाजवादी डॉ. आंबेडकर यांना कधीपासून सन्मान देऊ लागले, हा प्रश्नच आहे. कन्नौज मेडिकल कॉलेजला डॉ. आंबेडकर यांचं नाव देण्यात आले होते, ते कुणी बदलले, हे सर्वांना माहिती आहे," असा टोलाही योगी आदित्यनाथ यांनी यावेळी विरोधकांना लगावला.