कष्टाचे फळ मिळालेच! झोपडीत राहणाऱ्या गरीब शेतकऱ्याच्या मुलाची UPSC मध्ये बाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 05:10 AM2024-04-18T05:10:46+5:302024-04-18T05:11:03+5:30
पवनला हे यश त्याच्या तिसऱ्या प्रयत्नानंतर मिळाले.
लखनौ : झोपडीत राहणाऱ्या एका गरीब शेतकऱ्याचा मुलगा पवनकुमारने यूपीएससी परीक्षेत २३९वी रँक मिळवून सर्वांनाच आश्चर्यचकित केले. पवनला हे यश त्याच्या तिसऱ्या प्रयत्नानंतर मिळाले. त्याचे झोपडीवजा घर तुम्ही पाहिले तर तुम्हाला कळेल, त्याच्या कुटुंबीयांना किती आनंद झाला असेल. कष्टाळू लोक, आपले भविष्य स्वत: घडवतात, यावर तुमचाही विश्वास बसेल. यूपीएससी नागरीसेवा परीक्षा २०२३ चा निकाल मंगळवारी जाहीर झाला. लखनौच्या आदित्य श्रीवास्तवने देशात पहिला आला, तर बुलंदशहरच्या पवनकुमारने या परीक्षेत २३९ वा क्रमांक पटकावला आहे.
पवनचे कुटुंब राहते झोपडीत
- बुलंदशहरच्या सायना तहसीलच्या रघुनाथपूर गावात पवनचे कुटुंब एका झोपडीत राहते. पवनच्या कुटुंबाकडे चार गुंठे शेतजमीनही आहे, त्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो, अशी माहिती समोर आली आहे.
- पवनला त्याच्या कुटुंबात चार भाऊ आणि बहिणी आहेत. अशा परिस्थितीत पवनसारखा तरुण लाखो उमेदवारांसाठी प्रेरणास्थानापेक्षा कमी नाही. पवनच्या यशाबद्दल ऐकून सर्व जण त्याच्या कुटुंबीयांचे अभिनंदन करत आहेत.
स्वयंअध्ययनातून तिसऱ्या प्रयत्नात यश
पवनने दिल्लीत राहून नागरीसेवा परीक्षेची तयारी केली होती. या कालावधीत त्याने स्वयंअध्ययनातून २३९वा क्रमांक पटकावला आहे. पवनला तिसऱ्या प्रयत्नानंतर हे यश मिळाले.
काय म्हणाले पवनचे कुटुंबीय?
- पवनची बहीण गोल्डी म्हणाली की, ती तिच्या भावाचे यश शब्दात सांगू शकत नाही.
- स्वअभ्यासामुळे त्याने हे यश संपादन केले आहे. पवनची आई सुमन यांनीही सांगितले की, त्या आपल्या मुलाच्या यशाने खूप आनंदी आहेत.
आयएएस अवनीश कुमार यांनी शेअर केला घराचा व्हिडीओ
‘ट्वेल्थ फेल’ हा प्रसिद्ध चित्रपट मनोज कुमार शर्मा यांच्या खऱ्याखुऱ्या जीवन कहानीवर आधारित चित्रपट आहे. त्यांनीही यूपीएससी परीक्षेत अथक कष्टांनंतर यश
मिळविले होते.
त्यांच्याप्रमाणेच सध्या आएएएस असलेले अवनीश कुमार यांचीही कथा आहे. त्यांनी पवनकुमारच्या झोपडीवजा घराचा व्हिडीओ एक्सवर शेअर केला.
‘पवन का घर. इन्होंने सिव्हिल सेवा परीक्षा में में २३९ वी रैंक पायी है. मेहनती लोग अपना भविष्य ख़ुद लिखते हैं,’ अशी कॅप्शन त्यांनी दिली आहे.