PM मोदी हिंदीत करत होते भाषण, तमिळमध्ये होत होतं ट्रान्सलेशन; काशी-तमिळ संगमममध्ये पहिल्यांदाच AI चा वापर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2023 10:52 PM2023-12-17T22:52:31+5:302023-12-17T22:55:12+5:30
या प्रयोगासंदर्भात बोलताना मोदी म्हणाले, "आज येथे आर्टिफिशअल इंटेलिजेन्स तंत्रज्ञानाचा नव्यानेच प्रयोग झाला आहे. ही एक नवी सुरुवात आहे आणि आशा आहे की, याच्या सहाय्याने मला आपल्यापर्यंत पोहोचणे सोपे होईल."
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (17 डिसेंबर) उत्तर प्रदेशातील वारानसीमध्ये काशी-तमिळ संगमममध्ये भाषण करताना नवा प्रयोग केला. त्यांच्या भाषणाचा तमिळ भाषेत अनुवाद करण्यासाठी आर्टिफिशअल इंटेलिजेन्सचा वापर करण्यात आला. याचे लोकांनीही स्वागत केले आहे.
काय म्हणाले पंतप्रधान मोदी -
या प्रयोगासंदर्भात बोलताना मोदी म्हणाले, "आज येथे आर्टिफिशअल इंटेलिजेन्स तंत्रज्ञानाचा नव्यानेच प्रयोग झाला आहे. ही एक नवी सुरुवात आहे आणि आशा आहे की, याच्या सहाय्याने मला आपल्यापर्यंत पोहोचणे सोपे होईल."
काशी-तमिळचे अद्भुत नाते -
मोदी म्हणाले, ''काशी-तमिळचे अद्भुत नाते आहे. आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संखेने शेकडो किलोमीटर अंतर पूर्ण करून काशीमध्ये आला आहात. आपण येथे अतिथी म्हणून नव्हे तर माझ्या कुटुंबातील सदस्य म्हणून आला आहात. मी आपल्या सर्वांचे 'काशी-तमिळ संगमम'मध्ये स्वागत करतो."
"तमिळनाडूहून काशीमध्ये येण्याचा अर्थ, महादेवाच्या एका घरातून त्यांच्याच दुसऱ्या घरात येणे असा आहे. तमिळनाडूहून काशीत येण्याचा अर्थ मदुराई मीनाक्षीकडून काशी विशालाक्षीकडे येणे असा आहे. यामुळेच तमिलनाडू आणि काशीकर यांच्या हृदयात जे प्रेम आहे, जो संबंध आहे, तो वेगळा आणि अद्वितीय आहे," असे मोदी म्हणाले.
काशीच्या विद्यार्थ्याचा उल्लेख -
पंतप्रधान मोदी म्हणाले, "एके काळी काशीचे विद्यार्थी राहिलेल्या सुब्रमण्य भारती यांनी लिहिले होते की, 'काशी नगर पुलवर् पेसुम् उरैताम् कान्चियिल् केट्पदर्कु ओर् करुवि सेय्वोम्', त्यांना म्हणायचे होते की, काशीमध्ये जे मंत्रोच्चार होतात, ते तामिळनाडूतील कांची शहरात एकण्याची व्यवस्था झाली तर कीती चांगले होईल. आज सुब्रमण्य भारती यांची ती इच्छा पूर्ण होत आहे."
'विविधतेत आत्मीयतेचे सहज आणि श्रेष्ठ स्वरूप आपल्याला क्वचितच कुठे बघायला मिळेल' -
पंतप्रधान मोदी म्हणाले, "जेव्हा आपल्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या काशीवर आक्रमणे होत होती, तेव्हा राजा पराक्रम पांडियन यांनी तेनकाशी आणि शिवकाशी येथे, असे म्हणत मंदिरे उभारली की, काशी नष्ट केली जाऊ शकत नाही. जगातील कुठल्याही सभ्यतेवर नजर टाका, आपल्याला विविधतेत आत्मीयतेचे एवढे सहज आणि श्रेष्ठ स्वरूप क्वचितच कुठे बघायला मिळेल"
पंतप्रधान म्हणाले, ''काशी-तमिळ संगमचा आवाज संपूर्ण देशभरात आणि जगभरात पोहोचत आहे. हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी सर्व संबंधित मंत्रालये, उत्तर प्रदेश सरकार आणि तमिळनाडूतील सर्व नागरिकांचे अभिनंदन करतो.''