कुत्र हरवलं अन् कुटुंबीयांनी खाणं-पिणं सोडलं; पोलिसांनी ५० सीसीटीव्ही तपासून लावला शोध
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2023 08:18 PM2023-12-02T20:18:38+5:302023-12-02T20:19:04+5:30
पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी जर्मन शेफर्ड या कुत्र्याचा शोध सुरू केला.
एखाद्याची सवय झाली की ती लवकर सुटत नाही असं नेहमी बोललं जातं. मग ती सवय माणसाची असो की मग कोणत्या मुक्या प्राण्याची. सवय ती सवयच... याच सवयीमुळे उत्तर प्रदेशातील आग्रा पोलिसांना १४ तासात ५० सीसीटीव्ही तपासून हरवलेल्या कुत्र्याचा शोध लावाला लागला. आग्रा येथील रामबाग परिसरात राहणाऱ्या प्राध्यापक अंजना वर्मा यांचा जर्मन शेफर्ड कुत्रा २९ नोव्हेंबर रोजी घराबाहेरून बेपत्ता झाला होता. अंजना वर्मा यांच्या संपूर्ण कुटुंबाने जर्मन शेफर्ड कुत्र्याचा शोध सुरू केला. बराच शोध घेऊनही कुत्रा मात्र सापडला नाही. आपल्या कुटुंबातील एक सदस्य घरी नसल्याने संपूर्ण कुटुंबाने खाणं-पिणं सोडलं. अखेर कुटुंबीयांनी पोलिसांची मदत घेण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी जर्मन शेफर्ड या कुत्र्याचा शोध सुरू केला. कुत्र्याच्या शोधात पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरातील जवळपास ५० सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. अथक परिश्रमानंतर फुटेजवरून दोन चोरट्यांची ओळख पटली. चोरटे कुत्र्याला घेऊन जाताना दिसले. मग पोलिसांनी कारवाई करत १४ तासांत दोन्ही चोरांना ताब्यात घेऊन जर्मन शेफर्ड कुत्रा अंजना वर्मा यांच्याकडे सोपवला.
५० सीसीटीव्ही तपासून लावला शोध
कुत्रा सापडल्यानंतर वर्मा कुटुंबीयांनी एकच जल्लोष केला. प्राध्यापक आणि मुक्या प्राण्यामधील प्रेम पाहून पोलीस चौकीत उपस्थित असलेले सर्वजण आश्चर्यचकित झाले. घरी परतण्यासाठी कुत्रा अंजना वर्मा यांना सतत ओढत होता. चोरट्यांनी जर्मन शेफर्ड कुत्रा विकण्याच्या उद्देशाने चोरल्याचे पोलीस तपासात उघड झाले. पोलिसांनी नाकाबंदी करून दोन्ही चोरट्यांना हातरस येथून कुत्र्यासह पकडले.