अयाेध्येत आजपासून प्राणप्रतिष्ठा पर्वास प्रारंभ, सहा दिवस पूजा-अर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 06:11 AM2024-01-16T06:11:13+5:302024-01-16T07:08:00+5:30

गर्भगृहात विराजमान करण्यासाठी म्हैसूरचे शिल्पकार अरुण योगिराज यांनी साकार केलेल्या रामलल्लाच्या मूर्तीची झाली निवड

Prana Pratistha Parva starts from today in Ayaedhya, six days of puja-archa | अयाेध्येत आजपासून प्राणप्रतिष्ठा पर्वास प्रारंभ, सहा दिवस पूजा-अर्चा

अयाेध्येत आजपासून प्राणप्रतिष्ठा पर्वास प्रारंभ, सहा दिवस पूजा-अर्चा

अयोध्या : येथील नवीन भव्य प्रभू श्रीराम मंदिरात रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारीला होत असताना त्याच्या आधीच्या विधींना १६ जानेवारीपासून प्रारंभ होणार आहे. सहा दिवसांच्या या सोहळ्यात विविध प्रकारच्या पूजाअर्चांचा समावेश असेल.

संपूर्ण सोहळ्यात छोटीशीदेखील चूक झाली तर तिचे कोणतेही परिणाम होऊ नयेत, यासाठीच्या प्रायश्चित्त पूजेने विधीला सुरुवात होईल ती १६ जानेवारीला. सध्या तात्पुरत्या मंदिरात विराजमान रामलल्ला व अन्य मूर्तींना मिरवणुकीने आणि मंत्रोच्चारात १७ जानेवारीला नवीन मंदिर परिसरात आणले जाईल. पवित्र नद्यांच्या जलाचा मूर्तींना अभिषेक, अष्टगंध, केशर, विविध प्रकारची अत्तरे, दूध, पंचगव्याचा अभिषेक केला जाईल. 

शर्कराधिवास या विधीमध्ये मूर्तींना साखरेत ठेवले जाते आणि साखरयुक्त जलाने अभिषेक केला जातो. फलाधिवासामध्ये मूर्ती फळांमध्ये ठेवणे, त्यासाठीची पूजा केली जाते. श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र या ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी संपूर्ण सोहळ्याची माहिती सोमवारी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारीला होणार आहे. 

असे आहे वेळापत्रक
१६ जानेवारी :  प्रायश्चित्त आणि कर्मकुटी पूजन
१७ जानेवारी : रामलल्ला मूर्तीचा मंदिर परिसरात प्रवेश
१८ जानेवारी (सायंकाळी) : तीर्थपूजन आणि जलयात्रा, जलाधिवास आणि गंधाधिवास
१९ जानेवारी (सकाळी) : औषधाधिवास, केसराधिवास, घृताधिवास. सायंकाळी : धान्याधिवास
२० जानेवारी (सकाळी) : शर्कराधिवास, फलाधिवास. सायंकाळी - पुष्पाधिवास
२१ जानेवारी (सकाळी) : मध्याधिवास. सायंकाळी - शय्याधिवास
२२ जानेवारी : प्राणप्रतिष्ठा सोहळा

कशी झाली मूर्तीची निवड?
गर्भगृहात शिल्पकार अरुण योगिराज यांनी बनविलेली रामलल्लाची मूर्ती विराजमान होणार आहे, अशी घोषणाही चंपत राय यांनी केली. मात्र, त्या रामलल्लाच्या मूर्तीचे छायाचित्र अद्याप जारी करण्यात आलेले नाही. म्हैसूरचे शिल्पकार योगिराज यांनी बनविलेल्या राममूर्तीची या मंदिरासाठी निवड करण्यात आली आहे, अशा बातम्या याआधीच प्रसारमाध्यमांनी दिल्या होत्या. त्यावेळी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी योगिराज यांचे अभिनंदनही केले होते. मात्र, त्यानंतर ट्रस्टकडून असे सांगण्यात आले की, अरुण योगिराज, गणेश भट्ट, सत्यनारायण पांडे या तीन मूर्तिकारांकडून रामलल्लाच्या तीन मूर्ती बनवून घेण्यात आल्या आहेत. त्यातील कोणती मूर्ती राम मंदिराच्या गर्भगृहात विराजमान करावी, याचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. त्यामुळे या विषयाची चर्चा काही काळ थांबली होती. 

सध्याची मूर्तीही ठेवणार गर्भगृहात
रामलल्लाची मूर्ती येत्या १८ जानेवारी रोजी राम मंदिराच्या गर्भगृहात विराजमान होईल. रामजन्मभूमीवर सध्या पुजली जात असलेली रामलल्लाची मूर्तीही गर्भगृहात ठेवण्यात येणार असल्याची माहिती चंपत राय यांनी दिली.

Web Title: Prana Pratistha Parva starts from today in Ayaedhya, six days of puja-archa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.