कुंभमेळ्यात एका नावाडी कुटुंबानं ४५ दिवसांत कमावले ₹३० कोटी, CM योगींनी विधानसभेत सांगितली 'सक्सेस स्टोरी'
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 21:40 IST2025-03-04T21:39:40+5:302025-03-04T21:40:32+5:30
या कुटुंबाने कुंभमेळ्याच्या ४५ दिवसांत तब्बल ३० कोटी रुपयांची निव्वळ बचत केल्याचे, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे...

कुंभमेळ्यात एका नावाडी कुटुंबानं ४५ दिवसांत कमावले ₹३० कोटी, CM योगींनी विधानसभेत सांगितली 'सक्सेस स्टोरी'
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर दिले. यावेळी, कुंभमेळ्याच्या आयोजनातून राज्याला एकूण तीन लाख कोटी रुपयांचा महसूल मिळाल्याचे सांगत, त्यांनी, विविध क्षेत्रातील कमाईचीही माहितीही दिली. दरम्यान, त्यांनी प्रयागराज येथील एका नावाडी कुटुंबाची यशोगाथाही सांगितली. या कुटुंबाने कुंभमेळ्याच्या ४५ दिवसांत तब्बल ३० कोटी रुपयांची निव्वळ बचत केल्याचे, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.
या नावाडी कुटुंबाची यशोगाथा अथवा सक्सेस स्टोरी सांगताना, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पक्षावरही थेट निशाणा साधला. ते म्हणाले, "समाजवादी पक्षाचे लोक सातत्याने म्हणत होते की, तेथे (प्रयागराज) नावाडी समाजाचे शोषण होत आहे. त्यांना पैसे कमवू दिले जात नाहीत. मात्र, वास्तव अगदी वेगळे आहे. तेथील एका नावाडी अथवा खलाशी कुटुंबाकडे १३० बोटी आहेत. एका बोटीने सुमारे २३ लाख रुपये कमावले आहेत. जर आपण रोजच्या बचतीचा विचार केला तर एका बोटीने जवाळपास ५० ते ५२ हजार रुपये कमावले आहेत. अशाप्रकारे, संपूर्ण कुटुंबाने केवळ ४५ दिवसांतच ३० कोटी रुपये कमावले आहेत."
मुख्यमंत्री योगी म्हणाले, "आपण २७ फेब्रुवारी रोजी कुंभमेळ्याच्या समारोपासाठी तिथे (प्रयागराज) गेलो होतो. प्रथम गंगा मातेप्रति कृतज्ञता व्यक्त केली आणि तिचे पूजन केले. यानंतर आपण तेथील नावाडी समाजाच्या लोकांसोबत संवाद साधला. त्यांच्यासाठी एक पॅकेजही जाहीर करण्यात आले.
योगी पुढे म्हणाले, आम्ही 'सबका साथ, सबका विकास'वर बोलतो. ४५ दिवसांच्या या कार्यक्रमाने केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगभरात भारताच्या वारशाची आणि विकासाची एक अनोखी छाप सोडली आहे. कुंभमेळ्याचे आयोजन करणे, ही आमच्यासाठी एक कठीण परीक्षा होती. केंद्र आणि राज्य सरकार यात यशस्वी झाले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाचा प्रतिध्वनी जगभरात दीर्घकाळ ऐकायला मिळेल.