अयोध्येत 'रामलल्ला'च्या प्राणप्रतिष्ठेची जय्यत तयारी, बजरंग दल काढणार शौर्य यात्रा, देशातील मंदिरांमध्ये होणार धार्मिक विधी!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 11:02 AM2023-09-11T11:02:41+5:302023-09-11T11:03:32+5:30
प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी प्रत्येक घरात पाच दीप प्रज्वलित करण्याच्या मोहिमेसह विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते देशातील ५ लाख गावांमध्ये पोहोचतील.
बहुप्रतिक्षित श्रीराम मंदिर पूर्ण तयार होऊन त्यात २०२४ मधील मकरसंक्रांतीनंतर शुभमुहूर्तावर रामलल्ला विराजमान होतील. त्यानंतर सर्वांना रामलल्लाचे दर्शन घेता येणार आहे. दरम्यान, रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा महोत्सवापूर्वी विश्व हिंदू परिषद आणि श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट संपूर्ण देशाचे वातावरण राममय करण्याच्या योजनेवर काम करत आहे. त्यामुळे प्राणप्रतिष्ठेपूर्वी देशभरात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून शौर्य यात्रा काढण्यात येणार आहे. तसेच, प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी प्रत्येक घरात पाच दीप प्रज्वलित करण्याच्या मोहिमेसह विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते देशातील ५ लाख गावांमध्ये पोहोचतील.
अयोध्येत विश्व हिंदू परिषदेची राष्ट्रीय कार्यकारिणी आणि श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या सदस्यांसोबत दोन दिवसीय जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. बैठकीत देशभरात आयोजित करण्यात येत असलेल्या कार्यक्रमांवर चर्चा करण्यात आली, त्यानंतर सर्व सदस्यांनी रामजन्मभूमी परिसरात मंदिर विकासाच्या प्रगतीचा आढावा घेतला. यादरम्यान विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष आलोक कुमार म्हणाले की, श्री रामजन्मभूमी प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम जगभरात आनंदोत्सव म्हणून साजरा केला जाईल. बजरंग दल प्राणप्रतिष्ठापूर्वी ३० सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर दरम्यान शौर्य यात्रा काढणार आहे. ही यात्रा देशातील पाच लाख गावातून जाणार आहे.
याचबरोबर, प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी देशभरातील मठ आणि मंदिरांमध्ये पूजा, पठण, यज्ञ, हवन आणि आरती होईल, असेही आलोक कुमार सांगितले. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी म्हणाले की, आज संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण आहे. लोक प्राणप्रतिष्ठा केव्हा होईल याची वाट पाहत आहेत आणि मला विश्वास आहे की लाखो लोक येथे दर्शनासाठी येतील. याचबरोबर, बैठकीला उपस्थित असलेले श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य कामेश्वर चौपाल म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीच्या तारखेबाबत अद्याप लेखी उत्तर मिळालेले नाही. आम्ही १५ ते २४ तारीख दिली आहे, मात्र २२ जानेवारी २०२४ ही तारीख तिथी मुहूर्तासाठी सर्वोत्तम आहे.
दरम्यान, लाखो भाविक राम मंदिर लोकार्पणावेळी उपस्थित राहू शकतील, असा अंदाज आहे. या सर्वांची सोय, पार्किंग व्यवस्था, स्वच्छता यावर आतापासूनच भर दिला जात आहे. मंदिर खुले झाल्यानंतर रामभक्तांना रामाच्या मूर्तीला हात लावण्याची संधी मिळणार नाही. भाविकांना गर्भगृहात प्रवेश दिला जाणार नाही. सुमारे ३५ फूट अंतरावरून लोकांना दर्शन घेता होईल. गर्भगृहाचे पावित्र्य राखण्यासाठी ही व्यवस्था करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. तसेच, हिंदू धार्मिक मान्यतेनुसार, मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करण्याचा अधिकार फक्त राजा आणि मंदिराच्या पुजाऱ्याला आहे. ही पारंपरिक पद्धत लक्षात घेऊन केवळ पंतप्रधान आणि पुजारी यांनाच गर्भगृहात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.