उर्दूतील प्राचीन रामचरित मानस ग्रंथाचे संवर्धन, देशातील सर्वांत मोठ्या मदरशाचा पुढाकार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 11:06 AM2024-01-16T11:06:32+5:302024-01-16T11:07:11+5:30
महर्षी वाल्मिकी लिखित रामायणचा २७२ पानांचा उर्दू अनुवाद १९४९ मध्ये आचार्य महाकवी शिव नारायण तसकीन यांनी केला होता.
सहारनपूर : अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त देशभरात रामायण व श्रीरामचरित मानस ग्रंथाची मागणी वाढली आहे. अशातच काही वर्षांपूर्वी उर्दूत अनुवादित केलेले दोन्ही ग्रंथांचे जतन देशातील सर्वांत मोठी मदरसा असलेल्या उत्तर प्रदेशच्या देवबंद येथील दारुल उलूम मदरशाच्या वाचनालयात केले
आहे. ते शोकेसमधून पाहण्यास उपलब्ध आहेत.
श्रीरामचरित मानसचा उर्दू अनुवाद १९२१ मध्ये महर्षी स्वामी शिवबरत लाल बर्मन यांनी केला होता. सुमारे १३२१ पानांचा हा अनुवादित ग्रंथ आहे. तर महर्षी वाल्मिकी लिखित रामायणचा २७२ पानांचा उर्दू अनुवाद १९४९ मध्ये आचार्य महाकवी शिव नारायण तसकीन यांनी केला होता.
रसायनांच्या मदतीने जतन
हे दोन्ही ग्रंथ अतिशय जुने असल्याने त्याची पानेही बरीच जीर्ण झाली आहेत. पानांवरील रंगही फिका झाला आहे. त्यामुळे ती जतन करण्यासाठी मदरशाने रसायनांचा वापर केल्याचे वाचनालयाचे प्रभारी मौलाना शफीक यांनी सांगितले.