कलह... लग्नानंतर पती निघाला सफाई कर्मचारी, पत्नी बनली अधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 06:07 PM2023-06-23T18:07:58+5:302023-06-23T18:09:37+5:30
बरेलीतील एका जोडप्याच्या नात्याची सुरुवातच खोटारडेपणातून झाली होती.
बरेली - जिल्ह्यातील एका महिला पीसीएस अधिकाऱ्याच्या पतीने स्वत:च्या जीवाला धोका असल्याचं म्हटलं आहे. सोशल मीडियातील चॅट शेअर करत पत्नी दुसऱ्या व्यक्तीशी संबंध असून दोघं मिळून मला ठार करण्याचा डाव आखत असल्याचं पीडित पतीने म्हटलं आहे. याप्रकरणी होमगार्डचे डीजी बी. के. मौर्य यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. कारण, पीडित पतीने आरोप केलेली व्यक्ती ही गाझियाबादमधील होमगार्डचे कमांडेंट आहे.
बरेलीतील एका जोडप्याच्या नात्याची सुरुवातच खोटारडेपणातून झाली होती. आता, या पती-पत्नीच्या नात्यात मोठी दरार पडली असून एकमेकांच्या जीवावर बेतेल इथपर्यंत हे सर्व पोहोचले आहे. प्रयागराज येथे सन २०१० मध्ये सरकारी नोकरदार युवक आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवतीचे लग्न झाले. त्यावेळी, दोन्ही कुटुंब आनंदी होते. सर्वकाही सुरळीत चाललं होतं. त्यात, २०१५ साली विवाहित तरुणी अधिकारी बनल्याने सर्वांनाच आनंद झाला. मात्र, हेच कारण या जोडप्याच्या वैवाहिक आयुष्यात मिठाचा खडा टाकणारं ठरलं.
सध्या बरेली येथे पीसीएस ऑफिसर पदावर असलेल्या महिलेनं सांगितलं की, लग्नावेळी पतीने स्वत: ग्रामविकास अधिकारी असल्याचं म्हटलं होतं. मात्र, ते स्वच्छता कर्मचारी असल्याचं पुन्हा निष्पन्न झालं. तर, पत्नीचे गाझियाबादमधील एका आरोपीसोबत घनिष्ठ संबंध आहेत. त्यामुळे, दोघे मिळून माझी हत्या करू शकतात, असा गंभीर आरोप पतीने केला आहे. आरोप-प्रत्यारोपाचं हे प्रकरण लखनौपर्यंत पोहोचल्यानंतर याप्रकरणी शासकीय स्तरावरुन चौकशी सुरू झाली आहे.
अविश्वास आणि धोका देऊन कुठलंही नातं टिकत नाही. लग्नाच्या ८ वर्षानंतर मला समजलं की माझा पती ग्रामविकास अधिकारी नसून सफाई कर्मचारी आहे. कुटुंब वाचावे आणि मुलांच्या भविष्याची काळजी असल्याने मी समजून घेतलं. पण, मानसिकदृष्ट्या त्रास असह्य झाला आहे. माझा व्हॉट्सअप चॅट पाहिलं जात होतं, ब्लॅकमेल केलं जात होतं. त्यामुळे, त्रस्त होऊन मी एप्रिल महिन्यात घटस्फोटासाठी अर्ज केल्याचं महिला अधिकाऱ्यानं म्हटलं आहे. तसेच, घटस्फोट देण्यासाठी प्रयागराज येथील माझं घर आणि ५० लाख रुपयांची मागणी पतीकडून झाल्याचा आरोपही अधिकारी महिलेनं केला आहे. माझ्यासाठी कायदा हा सर्वश्रेष्ठ असून मी कायद्याच्या मदतीनेच या परिस्थितून बाहेर पडेल, असेही त्यांनी म्हटलं.