रेल्वे फाटक पडलं अन् कार अडकली; समोरुन ट्रेन आली; पाहा काय घडलं
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 04:37 PM2024-01-11T16:37:04+5:302024-01-11T16:41:16+5:30
मोतीहारी-आनंद विहार एक्सप्रेस रेल्वेगाडीला चंदौसी येथील स्मशानभूमीजवळून क्रॉस व्हावे लागणार होते
गावात, शहरात किंवा शहरापासून जवळ असलेल्या रेल्वे फाटकांना ओलांडून अनेकदा आपल्याला प्रवास करावा लागतो. लहानपणी या रेल्वेच्या फाटकाजवळ उभे राहून वाट पाहणारे, आता रेल्वेचं फाटक पडलं तरी रेल्वेची वाट न पाहता फाटकाखालून लवकर निघून जाण्याचा प्रयत्न करत असतात. रेल्वे फाटक लागलेले असतानाही फाटकाखालून मार्ग काढणे अनेकदा धोक्याचे ठरते. उत्तर प्रदेशच्या संभल येथे अशी एक घटना उघडकीस आली आहे. रेल्वे क्रॉसिंगमधील फाटकातून गाडी बाहेर काढण्याच्या नादात ती कार फाटकातच अडकली होती.
अति घाई संकटात नेई म्हणतात, ती म्हण संभल येथे सत्यात उतरल्याचं दिसून आलं. रेल्वे क्रॉसिंगच्या ठिकाणी लावलेल्या फाटकात एक चारचाकी गाडी अडकली होती. चालकाने फाटकाखालून गाडी नेण्याचा केलेला प्रयत्न चांगलाच अंगलट आला होता. रेल्वे ट्रॅकवर गाडी फसल्याचे पाहून ट्रॅकमॅनने कंट्रोल रुमला तत्काळ माहिती दिली. त्यानंतर, आपत्कालीन परिस्थिती रेल्वे थांबवण्यात आली. रेल्वेने सिग्नल पार केला होता, ती फाटकाच्याजवळ पोहोचली होती. मात्र, ट्रॅकमॅनने रेल्वेला लाल झंडी दाखवून थांबवण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने रेल्वे फाटक येण्यापूर्वीच रुळावर थांबली आणि मोठी दुर्घटना टळली. या घटनेचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे. बुधवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
मोतीहारी-आनंद विहार एक्सप्रेस रेल्वेगाडीला चंदौसी येथील स्मशानभूमीजवळून क्रॉस व्हावे लागणार होते. दुपारी १.५७ मिनिटांनी ही गाडी रेल्वे फाटक क्रॉस करणार होती. मात्र, ट्रॅकमॅनच्या सतर्कतेमुळे दुर्घटना घडली. गेटमॅन संजीव कुमार यांनी फाटक बंद केले असतानाही, स्विफ्ट डिझाईर कारचालकाने गाडी फाटकातून आत घातली. त्यामुळे, दोन फाटकांच्यामध्ये ती कार अडकली होती. त्यामुळे, रेल्वे फाटकाच्या दोन्ही बाजुला उभे असलेल्या लोकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. लोकांचा गोंधळ ऐकून संजीव कुमार यांनी प्रसंग लक्षात आला. त्यामुळे, त्यांनी तत्काळ कंट्रोल रुमला सूचना दिली.
दरम्यान, रेल्वे सिग्नल पार करुन फाटकाजवळ आल्याचं पाहून स्विफ्ट कारमधील चालकाने गाडीतून धूम ठोकली होती. त्यानंतर, ट्रॅकमॅनने लाल झेंडी दाखवून रेल्वेला थांबण्याचा इशारा दिला. त्यामुळे, रेल्वे फाटकावर येण्यापूर्वीच थांबली होती. त्यानंतर, स्थानिकांनी धक्का देऊन स्विफ्ट कार रेल्वे ट्रॅकमधून बाहेर काढली आणि सर्वांचाच जीव भांड्यात पडला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.