मकर संक्रांतीनंतर होणार रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा, नरेंद्र मोदी राहणार उपस्थित
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 05:58 AM2023-06-21T05:58:34+5:302023-06-21T05:58:57+5:30
२४ जानेेवारीपासून या मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन भाविकांना भगवान रामाचे दर्शन घेता येणार आहे.
अयोध्या : उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे रामजन्मभूमीवर भव्य राममंदिर उभारण्यात येत आहे. त्यातील भगवान रामाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा येत्या १४ जानेवारी ते २४ जानेवारी या कालावधीत आयोजिण्यात आला आहे. २४ जानेेवारीपासून या मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन भाविकांना भगवान रामाचे दर्शन घेता येणार आहे.
मकर संक्रांतीनंतर होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित करण्यात येणार आहे. राममंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्र यांनी सांगितले की, यंदाच्या वर्षी डिसेंबर महिन्यापर्यंत अयोध्या येथील राममंदिर उभारणीचे काम पूर्ण होणार आहे. १६१ फूट उंच असलेल्या या मंदिराच्या तळमजल्याचे काम आता पूर्ण झाले आहे. श्रीरामजन्मभूमी तीर्थ ट्रस्टच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अयोध्येचे राममंदिर बांधून पूर्ण झाल्यानंतर त्याचा तळमजला हा राम कथेसाठी राखून ठेवण्यात येईल.
या मंदिराच्या तळमजल्यावर १६० कॉलम, पहिल्या मजल्यावर १३२ काॅलम, दुसऱ्या मजल्यावर ७४ कॉलम तसेच मंदिरात पाच मंडपही असणार आहेत. राममंदिराच्या बांधणीसाठी ४ लाख टन दगड व राजस्थानातील संगमरवराचा वापर केला जाणार आहे. या बांधकामात स्टील किंवा विटांचा वापर होणार नाही. (वृत्तसंस्था)
गर्भगृहाच्या दरवाजाला देणार सोन्याचा मुलामा
- अयोध्या येथील भगवान राम यांच्या मंदिराला सागवानी लाकडाचे ४६ दरवाजे असणार आहेत. त्याच्या गर्भगृहाच्या दरवाजाला सोन्याचा मुलामा दिला जाणार आहे.
- राममंदिराची वास्तू हजाराहून अधिक वर्षे उत्तम स्थितीत उभी राहील, असा विचार करून ती बांधण्यात आली आहे.
- एकूण ९ एकराच्या रामजन्मभूमीवर राममंदिराचे संकुल उभे राहत आहे. त्यातील तीन एकरावर भव्य राममंदिर उभारले जाईल, अशी माहिती श्रीरामजन्मभूमी तीर्थ ट्रस्टने दिली.
- गाभाऱ्यात ५ वर्षीय बालक स्वरूपात रामलल्लाची माेहक मूर्ती स्थापित करण्यात येणार आहे. मूर्ती साडेआठ फूट उंच राहणार असून सूर्यकिरणे श्रीरामाच्या ललाटीला स्पर्श करतील, अशी गाभाऱ्याची रचना राहील.