कोण आहेत रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणारे दीक्षित गुरूजी? महाराष्ट्राशी आहे खास कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 12:38 PM2024-01-22T12:38:20+5:302024-01-22T12:46:59+5:30

रामललाची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते शुभ मुहूर्तावर झाली

Ram Mandir Ayodhya who is pandit Laxmikant dixit main priest in Pranpratishtha programme | कोण आहेत रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणारे दीक्षित गुरूजी? महाराष्ट्राशी आहे खास कनेक्शन

कोण आहेत रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणारे दीक्षित गुरूजी? महाराष्ट्राशी आहे खास कनेक्शन

Ram Mandir Ayodhya, Laxmikant Dixit : अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचा आणि रामललाच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडला. सोमवारी, २२ जानेवारी २०२४ रोजी, दुपारी १२ वाजून २९ मिनिटांच्या शुभ मुहूर्तावर रामललाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त सुमारे ८४ सेकंदांचा होता, त्यात एकूण १२१ पुजार्‍यांच्या पथकाकडून हा विधी केला गेला. त्यात काशीचे लक्ष्मीकांत दीक्षित हे मुख्य पुजारी होते. लक्ष्मीकांत दीक्षित यांच्यासह ५ पुजारी गाभाऱ्याच्या आत उपस्थित होते. जाणून घेऊया कोण आहेत लक्ष्मीकांत दीक्षित आणि काय आहे त्यांचे महाराष्ट्राशी कनेक्शन.

कोण आहेत लक्ष्मीकांत दीक्षित?

लक्ष्मीकांत दीक्षित हे मूळचे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील आहेत. मात्र त्यांचे कुटुंब अनेक पिढ्यांपासून काशीमध्ये राहत आहे. त्यांच्या पूर्वजांनीही नागपूर आणि नाशिक या संस्थानांत अनेक धार्मिक विधी केले. लक्ष्मीकांत दीक्षित हे मीरघाट, वाराणसी येथील सांगवेद महाविद्यालयाचे वरिष्ठ प्राध्यापक आहेत. काशीच्या राजाच्या मदतीने सांगवेद महाविद्यालयाची स्थापना झाली. पंडित लक्ष्मीकांत हे काशीतील यजुर्वेदाच्या उत्तम अभ्यासकांमध्ये गणले जातात. पूजेच्या पद्धतीतही त्यांनी प्रभुत्व मिळवले आहे. लक्ष्मीकांत दीक्षित यांनी त्यांचे काका गणेश दीक्षित भट्ट यांच्याकडून वेद आणि विधींची दीक्षा घेतली. पंडित लक्ष्मीकांत यांचे पूर्वज प्रसिद्ध पंडित गागा भट्ट हे देखील आहेत, ज्यांनी १७ व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला होता.

लक्ष्मीकांत दीक्षित यांच्या अध्यक्षतेखाली १२१ पंडितांचा चमू १६ जानेवारीपासून प्राणप्रतिष्ठेचा विधी करत आहे. आज पंतप्रधान मोदी प्राणप्रतिष्ठा करत असताना, मोदींकडून विधी करून घेण्याचा मान बीडचे पुरोहित गजानन ज्योतकर यांना मिळाला. त्यांच्या मार्गदर्शनाच्या सहाय्याने पंतप्रधान मोदी यांनी हे रामललाची विधीवत प्राणप्रतिष्ठा आणि पूजा केली.

१२१ चमू असलेल्या या पुजाऱ्यांपैकी काशीतील ४० हून अधिक विद्वानांचा समावेश आहे. अयोध्येत आज राम मंदिरात दिवसभर यासंबंधीचे कार्यक्रम चालणार आहेत.

Web Title: Ram Mandir Ayodhya who is pandit Laxmikant dixit main priest in Pranpratishtha programme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.