Ram Mandir Pran Pratishtha Live Updates : रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा : ४ हजार साधू, ८८० उद्योगपती, ९३ खेळाडू... ७ हजारांहून अधिक पाहुण्यांमध्ये कोण-कोण?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 10:17 AM2024-01-22T10:17:06+5:302024-01-22T10:26:55+5:30
Ram Mandir Inauguration : या सोहळ्यासाठी अयोध्येतील महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ ते राम मंदिरापर्यंतचा संपूर्ण मार्ग फुलांनी सजवण्यात आला आहे.
अयोध्या : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (२२ जानेवारी) अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन काही तासांतच करणार आहेत. उद्घाटनापूर्वी रामललाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. या विशेष सोहळ्यात सहभागी होण्यासाठी देश-विदेशातील सुमारे ७१४० हजार पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. दरम्यान, या सोहळ्यासाठी अयोध्येतील महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ ते राम मंदिरापर्यंतचा संपूर्ण मार्ग फुलांनी सजवण्यात आला आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी देश- विदेशातील मंदिरांमध्ये उत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्री रामजन्मभूमी ट्रस्टने २५८ न्यायाधीश, वकील आणि कायदेतज्ज्ञांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आमंत्रित केले होते. याशिवाय ३० वैज्ञानिक, संरक्षण विषयाशी संबंधित ४४ अधिकारी, १५ कलाकार, ५० शिक्षणतज्ज्ञ, १६ साहित्यिक, ९३ खेळाडू, ७ डॉक्टर्स, ३० प्रशासकीय अधिकारी, प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियाशी संबंधित सुमारे १६४ लोक, आर्किओलॉजिस्टमधील ५ लोक, ८८० उद्योगपती, ४५ अर्थतज्ज्ञ, ४८ राजकीय पक्षांचे नेते, १०६ संघ आणि विहिंपशी संबंधित नेते, १५ श्री रामजन्मभूमी ट्रस्टशी संबंधित लोक, ९२ अनिवासी भारतीय, ४५ राजकीय कार्यकर्ते, ४०० कामगार, ५० कारसेवकांच्या कुटुंबीयांतील लोक आणि ४००० साधूंना निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. त्यापैकी बहुतांश आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
'या' बड्या व्यक्तींना आमंत्रण
प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी ज्या मोठ्या व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यामध्ये उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंबीय, रतन टाटा, गौतम अदानी, अनिल अग्रवाल, हिंदुजा समूहाचे अशोक हिंदुजा, अझीम प्रेमजी, नुस्ली वाडिया, टोरेंट समूहाचे सुधीर मेहता, जीएमआर समूहाचे जीएमआर राव, निरंजन हिरानंदानी, कुमार मंगलम बिर्ला, अजय पिरामल आणि आनंद महिंद्रा यांचा समावेश आहे.
कलाकारांना सुद्धा आमंत्रण
अमिताभ बच्चन, रजनीकांत, हेमा मालिनी, माधुरी दीक्षित, कंगना रणौत, आशा भोसले, अरुण गोविल, नितीश भारद्वाज, मधुर भांडारकर, प्रसून जोशी, आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनाही राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. याशिवाय क्रिकेट जगतातील सचिन तेंडुलकर, विराट कोहली, हरभजन सिंग आणि अनिल कुंबळे यांसारख्या अनेक खेळाडूंना सुद्धा आमंत्रित करण्यात आले आहे.