राम मंदिर बांधणाऱ्या कामगारांना मिळाले प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण, कारसेवकांनाही आमंत्रण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2024 11:03 PM2024-01-09T23:03:24+5:302024-01-09T23:06:29+5:30
मकर संक्रांतीनंतर सुरू होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेच्या वैदिक विधींची माहिती घेत आदित्यनाथ यांनी अधिकार्यांना तीर्थ क्षेत्र ट्रस्टला सोहळ्याच्या सुरक्षा आणि इतर व्यवस्थेत सर्व आवश्यक सहकार्य करण्याचे निर्देश दिले.
अयोध्या : 22 जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात राम मंदिराच्या उभारणीत भूमिका बजावणाऱ्या काही कामगारांना आमंत्रित करण्यात आले आहे. यासोबतच ज्या कारसेवकांनी कार सेवेच्या वेळी प्रत्येकी 100 रुपयांची देणगी दिली होती, त्यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. सूत्रांनी मंगळवारी ही माहिती दिली.
दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी श्री रामलला आणि हनुमान गढीचे दर्शन आणि पूजन केल्यानंतर श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या अधिकाऱ्यांचीही बैठक घेतली. मकर संक्रांतीनंतर सुरू होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेच्या वैदिक विधींची माहिती घेत आदित्यनाथ यांनी अधिकार्यांना तीर्थ क्षेत्र ट्रस्टला सोहळ्याच्या सुरक्षा आणि इतर व्यवस्थेत सर्व आवश्यक सहकार्य करण्याचे निर्देश दिले.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, "अयोध्येत अभिषेक सोहळ्यासाठी येणाऱ्या मान्यवरांचा आदरातिथ्य व्हावा. प्रत्येक व्हीआयपी अतिथीच्या विश्रांतीची जागा आगाऊ निवडली पाहिजे. हवामानाचा विचार करता, काही पाहुणे एक-दोन दिवस आधी येण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत त्यांच्या राहण्याची उत्तम व्यवस्था व्हायला हवी. अयोध्येत हॉटेल आणि धर्मशाळा आहेत. होम स्टेची व्यवस्थाही उपलब्ध आहे. टेंट सिटींची संख्या वाढवण्याची गरज आहे. कुंभाच्या धर्तीवर अयोध्येत 25-50 एकरांवर भव्य टेंट सिटी बनवायला हवी."
याचबरोबर, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, 22 जानेवारीनंतर जगभरातील रामभक्त अयोध्येत दाखल होतील आणि त्यांच्या सोयीसाठी संपूर्ण शहरात वेगवेगळ्या भाषांमधील फलक लावण्यात यावेत. हे मार्गदर्शक फलक संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट असलेल्या भाषांमध्ये आणि संयुक्त राष्ट्रांच्या सहा भाषांमध्ये असावेत. तसेच, 22 जानेवारीला सायंकाळी हरदेव मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.