युपीत 'हर्ट'संबंधित पेशंट्सना वाटले जातात ग्रंथ 'रामायण अन् भगवत गीता'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2023 01:03 PM2023-12-07T13:03:20+5:302023-12-07T13:05:42+5:30
ह्रदयरोगाशी संबंधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने लक्षणीय वाढ होताना दिसत आहे.
कानपूर - उत्तर प्रदेशातील सर्वात मोठी कार्डिओलॉजी संस्था कानपूर येथे कार्यरत आहे. येथे उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांना डॉक्टरांकडून भगवत गीता, रामायण यांसारखे ग्रंथ देतात. विशेष म्हणजे डॉक्टर्स आणि रुग्णांकडूनही याचे फायदे सांगितले जात आहेत. विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घालून येथील रुग्णालयात रुग्णांवर केलेले उपचार रुग्णांच्या प्रकृती सुधारणेसाठी फायदेशीर ठरत असल्याचं डॉ. नीरजकुमार यांनी म्हटलं.
ह्रदयरोगाशी संबंधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. अनेकदा ह्रदयरोगाशी संबंधित समस्या जीवघेणी ठरत असल्याचेही दिसून आले आहे. कारण, ह्रदयाशी संबंधित रोगावर उपचार करण्यासाठी रुग्णांना कार्डिओलॉगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या मनात एक भीती निर्माण होते, अनेक प्रश्न उपस्थित होतात. ही भीती आणि गोंधळेली परिस्थिती दूर करण्यासाठी उत्तर प्रदेशातील सर्वात मोठ्या सरकारी रुग्णालयाने असा पुढाकार घेतला आहे.
कानपूर येथील कार्डिओलॉजीशी संबंधित ह्रदयरोगाच्या रुग्णांना धार्मिक व अध्यात्मिक उपचाराचा डोस दिला जात आहे. येथील रुग्णांना औषधोपचारासह भगवत गीता, सुंदरकांड, रामायण, हनुमान चालिसा यांची पुस्तक मोफत वाटण्यात येत आहेत. रुग्णालयात एखादा रुग्ण दाखल होताच, त्यांना ही पुस्तके दिली जातात. त्यानंतर, या पुस्तकांचे वाचन करण्याचा सल्लाही दिला जातो. आयुष्यातील ताणतणाव दूर होऊन जीवनाचा सार समजण्यासाठी हे ग्रंथ उपयुक्त आहेत, असं सांगण्यात येतं.
वरिष्ठ ह्रदयरोग तज्ज्ञ नीरज कुमार यांच्याकडून ही सर्व प्रक्रिया राबविण्यात येत आहे. डॉ. नीरज कुमार म्हणतात, ह्रदयरोगाशी संबंधित रुग्णाला मानसिक व शारिरीकदृष्ट्या स्थीर ठेवणे गरजेचे असते. रुग्णाची प्रकृती आणखी खराब होऊ नये याची काळजी घेणे आवश्यक असते. त्यांचा बीपी, शुगर आणि पल्सरेट स्थीर ठेवणे गरजेचे असते. कारण, यापैकी काहीही वाढल्यास शस्त्रक्रिया करताना अडचणी निर्माण होतात. त्यावेळेस धार्मिक ग्रंथांचा मोठा आधार होतो, असे नीरजकुमार यांनी म्हटलं.
गेल्या १ वर्षांपासून हे काम सुरू असून या वर्षभरात जवळपास ६०० रुग्णांना धार्मिक ग्रंथांचं वाटप करण्यात आलं आहे. या पुस्तकांच्या वाचनामुळे रुग्णाच्या मनातील भीती दूर होऊन ते नॉर्मल वर्तणूक करतात. तसेच, शस्त्रक्रियेबाबत त्यांच्या मनातील भीतीही दूर होऊन जाते. दरम्यान, येथील रुग्ण सरोजिनी मिश्रा यांनीही धार्मिक ग्रंथांच्या वाचनाचे फायदे सांगितले आहेत. भगवतगीता वाचन केल्यामुळे ताकद आणि मन:शांती मिळत असल्याचं रुग्ण हरी यांनी म्हटलं.