रामलल्ला रंगले होळीच्या रंगात, अयोध्येत होलिकोत्सव साजरा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 06:51 AM2024-03-26T06:51:58+5:302024-03-26T06:52:11+5:30
राममंदिराच्या निर्माणानंतर प्रथमच आलेल्या होलिकोत्सवामुळे अयोध्येत उत्साहपूर्ण वातावरण होते.
अयोध्या : होळीचे गीत, नैवेद्याला छप्पन भोग आणि रंगांची उधळण अशा उत्फुल्ल वातावरणात अयोध्येत सोमवारी होलिकोत्सव साजरा करण्यात आला. रामलल्लाच्या मूर्तीला रंग लावण्यात आला होता.
राममंदिराच्या निर्माणानंतर प्रथमच आलेल्या होलिकोत्सवामुळे अयोध्येत उत्साहपूर्ण वातावरण होते. रामलल्लाच्या सान्निध्यात रंगोत्सव साजरा करण्यासाठी हजारो भाविक अयोध्येत आले होते. प्रत्यक्ष मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीला हलकासा रंग लावण्यात आला होता, तसेच रामाला आवडतील अशा पदार्थांचा नैवेद्य दाखविण्यात आला.
पहाटेच्या आरतीनंतर होळीच्या गीतांनी परिसर दणाणला होता. विविध रंगांची उधळण, फुले, गुलाबपुष्प इत्यादींचा वर्षाव मंदिर परिसरात करण्यात आला. प्रत्येकजण रंगात रंगून परस्परांना होळीच्या शुभेच्छा देत होता. राममंदिरात प्रतिष्ठापना झाल्यानंतरची रामलल्लाची ही पहिलीच होळी असून त्यानिमित्ताने मंदिर विविध पुष्पहारांनी सजविण्यात आले आहे.
रामाच्या भाळी गुलाल लावण्यात आला असून गुलाबी रंगाची वस्त्रे मूर्तीला नेसविण्यात आली आहेत, अशी माहिती राम मंदिराचे पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी यावेळी दिली.