रामलल्लाचे गर्भगृहात आगमन; पूजा-अर्चा, विधींनी भारले वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 06:04 AM2024-01-19T06:04:00+5:302024-01-19T06:04:32+5:30
ही पूजा वाराणसीचे आचार्य गणेश्वर शास्त्री द्रविड आणि त्यांचे सहकारी लक्ष्मीकांत वाजपेयी यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
- त्रियुग नारायण तिवारी
अयोध्या : श्रीराम मंदिराच्या गर्भगृहात गुरुवारी रामलल्लाची मूर्ती आसनावर विधिवत पद्धतीने ठेवण्यात आली. त्यानंतर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी सुरू असलेल्या विधींपैकी एक असलेला गणेशपूजन, वरुणपूजा, जलाधिवास विधी पार पडला.
ही पूजा वाराणसीचे आचार्य गणेश्वर शास्त्री द्रविड आणि त्यांचे सहकारी लक्ष्मीकांत वाजपेयी यांच्या नेतृत्वात करण्यात आली. यावेळी यजमान दाम्पत्य डॉ. अनिल मिश्रा व त्यांच्या पत्नी, ट्रस्टचे सचिव चंपत राय, कोषाध्यक्ष आचार्य गोविंदगिरी आदी उपस्थित होते.
आज कोणते विधी?
प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शुक्रवारी औषधाधिवास, केसराधिवास, घृताधिवास आणि धान्याधिवास विधी पार पडणार आहेत. त्यानंतर शनिवारी शर्कराधिवास, फलाधिवास आणि पुष्पाधिवास हे विधी होणार आहेत.
केंद्रीय कार्यालये, बॅंकांना अर्धा दिवस सुट्टी
अयोध्येतील राम मंदिरातील अभिषेक सोहळ्यामुळे २२ जानेवारी रोजी देशभरातील सर्व केंद्र सरकारी कार्यालये अर्धा दिवस बंद राहणार आहेत, असे कार्मिक मंत्रालयाने गुरुवारी जाहीर केले. सार्वजनिक बँका, ग्रामीण बँका आणि विमा कंपन्या, वित्तीय संस्था व केंद्र सरकारी कार्यालयांना या दिवशी अर्धा दिवस सुट्टी जाहीर झाली आहे.
चार तास चालला आगमन सोहळा
पुजारी अरुण दीक्षित यांनी सांगितले की, रामलल्लाची मूर्ती गर्भगृहात दाखल झाली आहे. ती प्रतिष्ठापित (विराजमान) झालेली नाही. मूर्ती गर्भगृहात आसनावर ठेवण्यात आली. या प्रक्रियेला ४ तास लागले. गुरुवारी ‘गणेश पूजा’ आणि ‘वरुण पूजा’ करण्यात आली.
रामलल्लाची मूर्ती पाण्यात ठेवली गेली ज्याला ‘जलाधिवास’ म्हणतात. १२१ पुरोहितांना त्यांची पूजा कर्तव्ये सोपवली गेली आणि मंदिराच्या आवारात गर्भगृहाबाहेर वास्तूपूजा करण्यात आली. पूजन सोहळ्यावेळी सामूहिक रामायण पठण करण्यात आले.
अयोध्येत रस्त्यांवर धनुष्यबाणांच्या कलाकृती
अयोध्येत नव्याने बांधण्यात आलेल्या राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याच्या आधी, शहर पूर्णपणे सजले आहे. भगवान राम आणि त्यांचे धनुष्यबाण दर्शविलेल्या कलाकृतींनी शहर सजले आहे.
उड्डाणपुलावर पथदिवे बसवण्यात आले आहेत. पारंपरिक ‘रामानंदी टिळक’ थीमवर आधारित डिझाइन्स असलेले दीपस्तंभ लक्ष वेधून घेत आहेत.