अयोध्येतील राम मंदिर उभारणीत मराठी माणसांची अहोरात्र सेवा; घरदार सोडून रामचरणी लीन
By यदू जोशी | Published: December 27, 2023 05:16 AM2023-12-27T05:16:19+5:302023-12-27T05:17:00+5:30
बांधकामादरम्यान एकही दुर्घटना नाही
यदु जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क, अयोध्या ( Marathi News ): येथील प्रभू श्रीराम मंदिराचे उद्घाटन २२ जानेवारीला होत असताना गेली काही वर्षे या भव्य मंदिराच्या उभारणीसाठी अहोरात्र खपणाऱ्या मराठी माणसांची भेट झाली. हे भव्यदिव्य मंदिर साकारण्यात त्यांचे अमूल्य योगदान हा मराठी जगतासाठी अभिमानाचा विषय म्हणावा लागेल. आपले घरदार सोडून रामचरणी सेवा देणारे हे मराठीजन भरभरून बोलले.
‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र’ या ट्रस्टतर्फे नियुक्त असलेले पुण्याचे जगदीश आफळे यांचे तर कुटुंबच प्रभू रामाच्या सेवेत आहे. ते स्वत: येथे प्रकल्प व्यवस्थापक आहेत. निष्णात अभियंता म्हणून बांधकामाचे बारकावे त्यांना ठाऊक आहेत. बांधकामात असलेल्या कंपन्या, अधिकारी यांच्याशी समन्वयाचे काम ते करतात. त्यांच्या पत्नी माधुरी आफळे देणगी काऊंटर सांभाळतात. त्यांचा मूर्तिकला, शिल्पकलेचा अभ्यास मंदिर उभारणीसाठी फायद्याचा ठरला आहे. त्यांच्या कन्या तेजस्विनी जोशी या पुरातत्व शास्त्रज्ञ आहेत. हीच राम जन्मभूमी असल्याचे पुरावे गोळा करण्यासाठी जे उत्खनन झाले त्यात त्यांचे योगदान आहे.
मंदिराच्या आजवरच्या बांधकामादरम्यान एकही दुर्घटना झालेली नाही. येथे सुरक्षा व्यवस्थापक असलेले बोरिवली; मुंबईचे संतोष बोरे यांनी त्यासाठीची बारीकसारीक काळजी घेतली. बांधकामासाठी राबणाऱ्या प्रत्येकाला सुरक्षित वातावरण दिले. जगन्नाथ गुळवे हे छत्रपती संभाजीनगरचे. ते यांत्रिकी अभियंता आहेत. जळगावचे सुभाष चौधरी विद्युत अभियंता आहेत. अविनाश संगमनेरकर हे नागपूरकर. ते स्थापत्य अभियंता आहेत.
लार्सन अँड टुब्रो ही कंपनी सुरूवातीपासूनच राम मंदिर उभारणीशी जोडली गेली आहे. विहिंपचे तत्कालीन अध्यक्ष अशोक सिंघल, उद्योगपती घनश्यामदासजी बिर्ला आणि लार्सन अँड टुब्रोचे तत्कालिन मुख्य कार्यकारी मुकुंद नाईक यांच्यात बऱ्याच वर्षांपूर्वी जेव्हा राम मंदिर बांधकामाबाबत चर्चा झाली, तेव्हापासून एल अँड टीचे या मंदिराशी भावनिक नाते आहे. या कंपनीचे बांधकाम व्यवस्थापक सतीश चव्हाण हे सध्या महत्त्वाचे योगदान देत आहेत. टाटा कन्सल्टन्सीचे प्रकल्प व्यवस्थापक राधेय जोशी हे मंदिर उभारणीच्या कार्याचे अविभाज्य अंग बनले आहेत.
सर्व काही लोकवर्गणीतूनच
श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी पहिल्या टप्प्यात ११०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यातील ६०० कोटी रुपयांचा खर्च आतापर्यंत झाला आहे. केंद्र वा राज्य सरकारकडून एकही पैसा घेण्यात आलेला नाही. कोणतीही संस्था वा कंपनीकडून देणगी घ्यायची नाही, असा धोरणात्मक निर्णय आधीच न्यासाने घेतला आहे. केवळ व्यक्तिगत देणगीच आम्ही स्वीकारतो. सगळे काही लोकवर्गणीतूनच साकारले आहे, अशी माहिती प्रकल्प व्यवस्थापक जगदीश आफळे यांनी दिली.