पावसामुळे रस्ता खचला, खड्ड्यात कार अडकली; सत्ताधारी भाजपा विरोधकांच्या निशाण्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2024 08:17 PM2024-03-03T20:17:32+5:302024-03-03T20:31:02+5:30
पावसासोबतच काही भागात गाराही पडल्या.
उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये रविवारी जोरदार पाऊस झाला. पावसासोबतच काही भागात गाराही पडल्या. पावसामुळे अनेक रस्त्यांवर पाणी साचले होते. पावसामुळे काही प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली होती. अशातच शहरातील विकास नगर परिसरात मध्यभागी रस्ता खचला अन् एकच खळबळ माजली. रस्ता खचल्याचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यावरून राजकारण देखील तापले असून समाजवादी पार्टीने सत्ताधारी भाजपावर हल्लाबोल केला. खरं तर रस्ता खचल्याने एक कार त्यात अडकली. अथक प्रयत्नांनंतर संबंधित कार बाहेर काढण्यात यश आले. यानंतर दोन्ही बाजूची वाहतूक बंद करण्यात आली.
दरम्यान, लखनौमधील विकास नगर सेक्टर ४ मध्ये असलेल्या यदुवंश क्लिनिकजवळील मुख्य रस्ता अचानक खचल्याने २० फूट खोल आणि २० फूट रुंद खड्डा तयार झाला. खड्ड्यात कार अडकल्याने बघ्यांची गर्दी जमली. कसाबसा चालक गाडीतून बाहेर आला आणि त्याने विकासनगर पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळ गाठून रस्ता बंद केला.
पावसामुळे रस्ता खचला
विकासनगरमधील सेक्टर ४ येथील यदुवंश क्लिनिकजवळील मुख्य रस्ता रविवारी दुपारी एक वाजता अचानक मोठा आवाज होऊन खचला. रस्ता खचल्याने वाहतूक विस्कळीत झाली. तेथून जात असलेले व्यापारी शशी भूषण नाथ मिश्रा यांची कार खड्ड्यात जाऊन अडकली. गाडीची मागील दोन्ही चाके खड्ड्यात अडकल्याने गाडी बाहेर निघत नव्हती. रस्ता खचल्याचा दाखला देत समाजवादी पार्टीने सरकारला लक्ष्य केले.
योगी सरकार मतलब भ्रष्टाचार की गारंटी!
— Samajwadi Party (@samajwadiparty) March 3, 2024
लखनऊ के विकास नगर में हल्की सी बारिश में बीच सड़क पर हुआ कई फुट गहरा गड्ढा। गड्ढे में गिरने से बाल बाल बची सड़क पर चल रही कार।
विकास के नाम पर केवल अपना विकास कर रही भाजपा। जनता देगी अपने वोट से जवाब। pic.twitter.com/5y9xHrwG0a
'सपा'ने सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटले की, योगी सरकार म्हणजे भ्रष्टाचाराची गॅरंटी. लखनौच्या विकास नगरमध्ये हलक्या पावसामुळे रस्त्याच्या मधोमध अनेक फूट खोल खड्डा तयार झाला आहे. रस्त्यावरून जाणारी कार खड्ड्यात पडून थोडक्यात बचावली. भाजप केवळ विकासाच्या नावाखाली स्वतःचा विकास करत आहे. जनता त्यांना आपल्या मतदानातून उत्तर देईल.