मुलाला अटक होताच आमदारानं केलं सरेंडर; घरात सापडला १७ वर्षीय तरुणीचा मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 15:12 IST2024-09-19T15:12:21+5:302024-09-19T15:12:36+5:30
समाजवादी पार्टीचे आमदार जाहिद बेग यांच्या अडचणी वाढल्या.

मुलाला अटक होताच आमदारानं केलं सरेंडर; घरात सापडला १७ वर्षीय तरुणीचा मृतदेह
आपल्या घरात लहान मुलीचा मृतदेह आढळल्याने समाजवादी पार्टीचेआमदार जाहिद बेग यांच्या अडचणी वाढल्या. त्यांच्या मुलाला अटक झाल्यानंतर त्यांनी सरेंडर केले. आमदार बेग यांच्यावर लहान मुलीकडून जबरदस्तीने काम करुन घेतल्याचा आरोप आहे. त्यानंतर परिस्थितीला कंटाळून मुलीने आत्महत्या केली. या प्रकरणी बुधवारी त्यांचा मुलगा जेम बेग याला मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती. मात्र तेव्हा आमदार जाहिद बेग आणि त्यांची पत्नी पोलिसांना सापडली नव्हती. मात्र, आता त्यांनी सरेंडर केले. त्यांनी भदोही येथील न्यायालयात हजेरी लावली.
पोलिसांनी सांगितले की, मृत तरुणी आमदाराच्या घरी हेल्पर म्हणून काम करायची आणि अनेक वर्षांपासून तिथे राहत असे. पण, घराच्या वरच्या मजल्यावरील एका खोलीत ती लटकलेल्या अवस्थेत आढळली. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मुलीने गळफास घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलीस अधीक्षक मीनाक्षी कात्यायन यांनी सांगितले की, आमदार बेग यांचा मुलगा जेम बेग याच्याविरुद्ध पुरावे सापडल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
...अन् आमदाराच्या अडचणी वाढल्या
तसेच आमदार जाहिद बेग आणि त्यांची पत्नी सीमा बेग यांनी १७ वर्षांच्या मुलीला तिच्या इच्छेविरुद्ध काम करायला लावल्याचे त्यांच्या तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. सततच्या त्रासाला कंटाळून मुलीने ८ सप्टेंबरच्या रात्री आत्महत्या करुन जीवन संपवले. त्याच्या दुसऱ्या दिवशी अर्थात ९ सप्टेंबरला पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. आमदार आणि त्यांच्या पत्नीवर BNS च्या कलम १०८ अन्वये आधीच गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे. त्यांच्या चौकशीत आणखी एक १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी गेल्या दोन वर्षांपासून आमदाराच्या घरी काम करत असल्याचे समोर आले.