आझम खान मुस्लीम असल्याने त्यांना त्रास दिला जातोय असे भाजपावालेच सांगतात - अखिलेश यादव
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 04:40 PM2023-10-18T16:40:13+5:302023-10-18T16:40:37+5:30
समाजवादी पार्टीचे ज्येष्ठ नेते आझम खान यांच्या अडचणी वाढवणारी बातमी समोर आली.
ज्या उत्तर प्रदेशातून देशाच्या सत्तेचा मार्ग जातो तेथील राजकारणात हिंदू आणि मुस्लीम या दोन बाजू नेहमीच केंद्रस्थानी राहिल्या आहेत. आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सर्वच राजकीय पक्ष लागले आहेत. अशातच समाजवादी पार्टीचे ज्येष्ठ नेते आझम खान यांच्या अडचणी वाढवणारी बातमी समोर आली. बुधवारी न्यायालयाने आझम खान यांना मुलगा अब्दुल्ला आझम यांच्या दोन जन्म प्रमाणपत्रांच्या प्रकरणात दोषी ठरवले. अब्दुल्ला आझम यांच्यासह आझम खान आणि त्यांची पत्नी तंझीन फातिमा या तिघांनाही सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायालयाने शिक्षा ठोठावल्यानंतर समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सत्ताधारी भाजपाला लक्ष्य केले.
आझम खान हे मुसलमान असल्यामुळे त्यांच्याविरोधात षडयंत्र रचले जात असल्याची टीका अखिलेश यांनी केली. आझम खान यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या रामपूरच्या खासदार-आमदार न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणी भाजपा नेते आकाश सक्सेना यांनी गुन्हा दाखल केला होता. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत आझम खान यांचा मुलगा अब्दुल्ला आझम यांनी रामपूरच्या स्वार विधानसभा मतदारसंघातून समाजवादी पार्टीच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. या निवडणुकीतही त्यांनी बाजी मारली. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार आणि बसपा नेते नवाब काझिम अली खान यांनी अब्दुल्ला आझम यांच्या वयाबाबत उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. अब्दुल्ला आझम यांचे वय विधानसभेची निवडणूक लढवण्याचे नाही, असा आरोप नवाब काझिम यांनी केला होता.
अखिलेश यादवांची भाजपावर टीका
आझम खान आणि त्यांच्या कुटुंबीयांना शिक्षा जाहीर झाल्यानंतर सपा प्रमुख अखिलेश यादव म्हणाले, "आझम खान आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळेल. त्यांच्याविरोधात एक मोठा कट रचला जात आहे. या कटामुळेच आज त्यांना अशी शिक्षा भोगावी लागत आहे. भाजपामध्येच असलेले काही लोक सांगतात की, आझम खान मुस्लिम आहेत, म्हणूनच त्यांना अशी शिक्षा भोगावी लागत आहे."
आझम खान यांना ७ वर्षांची शिक्षा
दरम्यान, शैक्षणिक प्रमाणपत्रांमध्ये अब्दुल्ला आझम यांची जन्मतारीख १ जानेवारी १९९३ आहे, तर त्यांच्या जन्म प्रमाणपत्रात ३० सप्टेंबर १९९० दाखवण्यात आली आहे. या खटल्याची सुनावणी करताना उच्च न्यायालयाने अब्दुल्ला आझम यांनी सादर केलेले जन्म प्रमाणपत्र बनावट असल्याचे आढळून आले आणि स्वार मतदारसंघातून त्यांची निवडणूक रद्द केली. अब्दुल्ला आझम यांनी २०१७ मध्ये निवडणूक लढवली, तेव्हा त्यांचे वय २५ वर्षांपेक्षा कमी असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले होते. पण तरीही त्यांनी बनावट प्रमाणपत्राच्या आधारे निवडणूक लढवली.
अब्दुल्ला आझम यांनी रामपूरच्या स्वार विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली, तेव्हा शफीक अन्सारी त्यांचे प्रस्तावक होते. आता शफिक अन्सारी अपना दलात असून ते तिथे आमदार झाले आहेत. मात्र, २०१७ मध्ये अब्दुल्ला आझम स्वार मतदारसंघातून निवडणूक जिंकले होते. त्यानंतर या प्रकरणात नवा ट्विस्ट आला. रामपूरचे भाजपा आमदार आकाश सक्सेना यांनी अब्दुल्ला आझम यांच्याविरुद्ध रामपूरच्या गंज पोलीस ठाण्यात २०१९ मध्ये दोन जन्म प्रमाणपत्रे असल्याचा गुन्हा दाखल केला होता, ज्यामध्ये आझम खान आणि त्यांची पत्नी तंझीन फातिमा यांनाही आरोपी करण्यात आले होते. आता न्यायालयाने आझम खान, अब्दुल्ला आझम आणि तंझीन फातिमा यांना दोषी ठरवले असून तिघांनाही सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.