रामजन्मभूमी परिसराची सुरक्षा व्यवस्था SSF कडे सोपवली जाणार; प्राणप्रतिष्ठा महोत्सवापूर्वी मोठा निर्णय!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 10:11 AM2023-09-12T10:11:33+5:302023-09-12T10:12:30+5:30

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोमवारी रात्री एसएसएफच्या दोन बटालियनही अयोध्येत पोहोचल्या आहेत.

Security of Ram Janmabhoomi area will be entrusted to SSF; A big decision before Prana Pratistha Festival! | रामजन्मभूमी परिसराची सुरक्षा व्यवस्था SSF कडे सोपवली जाणार; प्राणप्रतिष्ठा महोत्सवापूर्वी मोठा निर्णय!

रामजन्मभूमी परिसराची सुरक्षा व्यवस्था SSF कडे सोपवली जाणार; प्राणप्रतिष्ठा महोत्सवापूर्वी मोठा निर्णय!

googlenewsNext

अयोध्या :  बहुप्रतिक्षित श्रीराम मंदिर पूर्ण तयार होऊन त्यात २०२४ मधील मकरसंक्रांतीनंतर शुभमुहूर्तावर रामलल्ला विराजमान होतील. त्यानंतर सर्व भाविकांना रामलल्लाचे दर्शन घेता येणार आहे. दरम्यान, रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा महोत्सवापूर्वी अयोध्येतील रामजन्मभूमी परिसराची सुरक्षा उत्तर प्रदेशच्या विशेष सुरक्षा दल एसएसएफकडे सोपवली जाणार आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोमवारी रात्री एसएसएफच्या दोन बटालियनही अयोध्येत पोहोचल्या आहेत. मात्र, तैनातीपूर्वी त्यांना एक आठवड्याचे विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. रामजन्मभूमीच्या सुरक्षेसाठी एसएसएफचे २८० जवान तैनात करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अयोध्येशिवाय काशी आणि मथुरेतील मंदिरांच्या सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारीही एसएसएफकडे दिली जाऊ शकते. विशेष सुरक्षेसाठी उत्तर प्रदेश सरकारने एसएसएफची स्थापना केली आहे. यामध्येउत्तर प्रदेश पोलीस आणि पीएसीच्या जवानांचा समावेश आहे.

सध्या अशी आहे सुरक्षा व्यवस्था
रामजन्मभूमी परिसराच्या सुरक्षेसाठी पीएसीच्या १२ कंपन्या कार्यरत आहेत. सीआरपीएफ राम लल्लाच्या आतल्या भागाचे रक्षण करते. सध्या येथे सीआरपीएफच्या सहा बटालियन तैनात आहेत, ज्यात महिला बटालियनचाही समावेश आहे. मंदिराच्या बाहेरील भागात आणि चेकिंग पॉइंटवर सिव्हिल पोलिसांचे पुरुष व महिला पोलिस तैनात आहेत.

'रामलल्ला'च्या प्राणप्रतिष्ठेची जय्यत तयारी
दरम्यान, 'रामलल्ला'च्या प्राणप्रतिष्ठेची जय्यत तयारी सुरू आहे. प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम येत्या जानेवारी महिन्यात होणार आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, रविवारी अयोध्येत विश्व हिंदू परिषदेची दोन दिवसीय बैठक होती. या बैठकीत देशभरात आयोजित करण्यात येत असलेल्या कार्यक्रमांवर चर्चा करण्यात आली, त्यानंतर सर्व सदस्यांनी रामजन्मभूमी परिसरात मंदिर विकासाच्या प्रगतीचा आढावा घेतला. यादरम्यान विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष आलोक कुमार म्हणाले की, श्री रामजन्मभूमी प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम जगभरात आनंदोत्सव म्हणून साजरा केला जाईल. बजरंग दल प्राणप्रतिष्ठापूर्वी ३० सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर दरम्यान शौर्य यात्रा काढणार आहे. ही यात्रा देशातील पाच लाख गावातून जाणार आहे.  

देशातील मंदिरांमध्ये होणार धार्मिक विधी!
याचबरोबर, प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी देशभरातील मठ आणि मंदिरांमध्ये पूजा, पठण, यज्ञ, हवन आणि आरती होईल, असेही आलोक कुमार सांगितले. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी म्हणाले की, आज संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण आहे. लोक प्राणप्रतिष्ठा केव्हा होईल याची वाट पाहत आहेत आणि मला विश्वास आहे की लाखो लोक येथे दर्शनासाठी येतील. याचबरोबर, बैठकीला उपस्थित असलेले श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य कामेश्वर चौपाल म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीच्या तारखेबाबत अद्याप लेखी उत्तर मिळालेले नाही. आम्ही १५ ते २४ तारीख दिली आहे, मात्र २२ जानेवारी २०२४ ही तारीख तिथी मुहूर्तासाठी सर्वोत्तम आहे.
 

Web Title: Security of Ram Janmabhoomi area will be entrusted to SSF; A big decision before Prana Pratistha Festival!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.