“सीता माता व्हिसा घेऊन आली होती का, सीमा हैदरला भारताचे नागरिकत्व द्यावे”; वकिलांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 08:07 PM2023-07-24T20:07:01+5:302023-07-24T20:11:24+5:30
Seema Haider: सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवण्याबाबत विचार सुरू असताना तिच्या वकिलांनी भारताचे नागरिकत्व मिळण्याची मागणी केली आहे.
Seema Haider: पाकिस्तानातून आपला प्रियकर असलेल्या सचिन मीनासोबत नेपाळमार्गे ग्रेटर नोएडातील रबुपुरामध्ये पोहोचलेली सीमा हैदर सध्या देशीतील चर्चेचा विषय बनली आहे. ती खरोखरच प्रेमासाठी भारतात आली, की पाकिस्तानची एजन्ट आहे? यावरही चर्चा सुरू आहेत. यूपी एटीएसनेही तिची चौकशी केली आहे. यातच सीमा हैदरबाबत नवनवीन खुलासे होत असून, तिला पाकिस्तानात परत पाठवण्याबाबत हालचाली सुरू असल्याचे सांगितले जात आहे. यातच आता सीमा हैदरला भारताचे नागरिकत्व द्यावे, अशी मागणी तिच्या वकिलांनी केली आहे.
सीमा हैदर आणि सचिनचे वकील एपी सिंह यांनी अजब विधान केले आहे. सीता माता नेपाळमधून व्हिसा घेऊन भारतात आल्या होत्या का?, अशी विचारणा एपी सिंह यांनी सीमाचा बचाव करताना केली आहे. सीमा हैदर यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी एपी सिंह रबुपुरा येथे पोहोचले होते. सचिन आणि सीमा हैदर यांच्या वतीने एपी सिंह यांनी राष्ट्रपतींना याचिकाही दिली आहे. सीमा हैदरला भारताचे नागरिकत्व द्यावे. पाकिस्तानात पाठवू नये, असे याचिकेत म्हटले आहे.
सीमा आता भारताची मुलगी आहे
बरेच लोक आहेत आणि अनेक मुली अशा आहेत, ज्यांच्याकडे अजून भारतीय नागरिकत्व नाही. अजूनही भारतात अभिमानाने राहतात. सीमा आता भारताची मुलगी आहे कारण तिने हिंदू धर्म स्वीकारला आहे. सीमा सिंदूर लावते. चुडा भरते आणि हाताला मेहंदी लावते. करवाचौथचे व्रतही दोनदा ठेवले आहे. सीमा हैदर म्हणण्याऐवजी सचिन मीना या नावाने हाक मारावी. ती आता भारताची मुलगी आहे. सीमाच्या पहिल्या पतीनेही घटस्फोट घेतल्याचे सांगितले आहे. अनेक वर्षे त्याला भेटलीही नाही, असे एपी सिंह यांनी सांगितले.
दरम्यान, सीमा बेकायदेशीरपणे भारतात आलेली नाही. तिच्याकडे नेपाळचा व्हिसा होता. त्यानंतरच सीमा भारतात दाखल झाली. नेपाळशी आमचे संबंध पूर्वीपासूनच चांगले आहेत. सीता माताही नेपाळमधून व्हिसा घेऊन भारतात आली होती का? अशी विचारणा एपी सिंह यांनी केली. सीमा आणि सचिन यांच्यात सच्चे प्रेम आहे. नेपाळमधील एका मंदिरात हिंदू परंपरांनुसार सीमाचे लग्न झाले. संशय असल्यास, लाय डिटेक्टर किंवा पॉलीग्राफी चाचणी घ्यावी. या प्रकरणाची सीबीआय किंवा रॉ मार्फत चौकशी झाली पाहिजे. सीमा निर्दोष आढळल्यास तिला भारतीय नागरिकत्व मिळालेच पाहिजे. यासोबतच त्याची सुरक्षाही सुनिश्चित करायला हवी, असेही एपी सिंह यांनी सांगितले.