सीमा हैदर आणि सचिनची तब्येत बिघडली, स्थानिक डॉक्टरांकडून उपचार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 11:48 AM2023-07-22T11:48:30+5:302023-07-22T12:07:38+5:30
सीमा आणि सचिनच्या प्रकृतीबाबत सचिनच्या कुटुंबीयांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
गेल्या काही दिवसांपासून सीमा हैदर आणि सचिन मीना, ही दोन नावे भरपूर चर्चेत आहेत. PUBG गेमद्वारे दोघे प्रेमात पडले आणि भारतीय सचिनसाठी पाकिस्तानी सीमा आपल्या चार मुलांसह नेपाळमार्गे अवैधरित्या भारतात आली. सध्या ती सचिनसोबत ग्रेटर नोएडात राहत आहे. मात्र, यादरम्यान सोशल मीडियावर काही लोकांनी सीमा हिच्यावर ती पाकिस्तानची गुप्तहेर असल्याचा आरोप केला. तर काही लोकांनी सीमाला पाकिस्तानच्या स्लिपर सेलची सदस्य असल्याचे सांगितले. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश एटीएसने सीमाची तब्बल १८ तास चौकशी केली.
दरम्यान, सीमा आणि सचिन यांची प्रकृती खालावल्याचे वृत्त आहे. दोघांनाही घरीच ग्लुकोज दिले जात आहे. सीमा आणि सचिन या दोघांनीही अस्वस्थता आणि अशक्तपणा जाणवत असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, कुटुंबीयांनी याबाबत स्थानिक डॉक्टरांना माहिती दिली. त्यानंतर दोघांची प्रकृती खालावल्याचे पाहून डॉक्टरांनी ग्लुकोज देण्याचा सल्ला दिल्याचे म्हटले जात आहे. मात्र, सीमा आणि सचिनच्या प्रकृतीबाबत सचिनच्या कुटुंबीयांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
"पाकिस्तानची गुप्तहेर नाही"
"मी स्वतःबद्दल खोटे बोलत नाही. मी पाकिस्तानची गुप्तहेर नाही. सोशल मीडियावर माझ्याविरोधात चुकीच्या गोष्टी बोलल्या जात आहेत, ज्या पूर्णपणे निराधार आहेत", असे उत्तर प्रदेश एटीएसने केलेल्या चौकशीनंतर सीमा हैदरने एका वृत्तवाहिनीला सांगितले. याचबरोबर, भारतीय लष्कराशी संबंधित लोकांशी संपर्क साधण्याच्या प्रश्नावर सीमाने सांगितले होते की, तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून कधीही कोणत्याही भारतीयाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली नाही किंवा भारतीय लष्कराशी संबंधित लोकांशीही संपर्क साधला नाही.
"अलीकडेच अकाउंट पब्लिक केले"
सीमाच्या म्हणण्यानुसार, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तिचे पाच अकाउंट होते. यातील दोन अकाउंट तिच्या मुलाची होती. मात्र, ती सोशल मीडियावर फारशी सक्रिय नव्हती. सोशल मीडियावर तिचे काही मित्रही होते. तिने आपले अकाउंट प्रायव्हेट ठेवले होते, याचा अर्थ तिच्या वतीने केलेल्या पोस्ट कोणीही पाहू शकत नाही. तसेच, सीमाने सांगितले की, अलीकडेच तिने आपले अकाउंट पब्लिक केले आहे, तेव्हापासून तिला हजारो फ्रेंड रिक्वेस्ट आल्या आहेत.