85 वर्षीय आजारी आईला रस्त्याच्या कडेला सोडून मुलगा फरार; पोलिसांनी दिला मदतीचा हात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 12:14 PM2023-08-09T12:14:40+5:302023-08-09T12:16:46+5:30
एक मुलगा त्याच्या 85 वर्षीय आईला उपचारासाठी हरदोईहून लखनऊला घेऊन आला होता आणि त्यानंतर तो आईला रस्त्याच्या कडेला सोडून बेपत्ता झाल्याची भयंकर घटना घडली आहे.
उत्तर प्रदेशच्या लखनौमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एक मुलगा त्याच्या 85 वर्षीय आईला उपचारासाठी हरदोईहून लखनऊला घेऊन आला होता आणि त्यानंतर तो आईला रस्त्याच्या कडेला सोडून बेपत्ता झाल्याची भयंकर घटना घडली आहे. रस्त्याच्या कडेला पावसात भिजत असलेल्या वृद्ध महिलेला रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या काही लोकांनी पाहिलं आणि याबाबत पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिसांनी महिलेच्या मदतीसाठी पुढाकार घेतला.
वृद्ध महिलेवर रुग्णालयात योग्य ते उपचार करून तिला वृद्धाश्रमात पाठवले. सध्या पोलीस महिलेच्या मुलाचा शोध घेत आहेत. कृष्णनगर पोलीस स्टेशनचे प्रभारी विक्रम सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी त्यांना काही दुकानदारांचा फोन आला होता. चौकात एक वृद्ध महिला पावसात भिजत असून ती फार दु:खी असल्याचं सांगण्यात आलं. पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि वृद्ध महिलेशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती काही वेळ शांत राहिली आणि नंतर ढसाढसा रडू लागली.
महिलेने सांगितले की तिचा मोठा मुलगा उपचारासाठी हरदोईहून लखनौला घेऊन आला होता आणि आता तो तिथून निघून गेला आहे. इन्स्पेक्टर यांच्या म्हणण्यानुसार, वृद्ध महिलेशी बोलल्यानंतर कळलं की तिला दोन मुलं आणि तीन मुली आहेत आणि ती मुलांसोबत राहते. मुलांने आपली सर्व मालमत्ता विकली आहे. गेल्या काही महिन्यांपासून ती आजारी होते. काही दिवस मुलांने उपचार केले, पण कदाचित आता मी त्यांच्यावर ओझे झाले आहे.
शनिवारी मोठ्या मुलाने मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचार करायचे असल्याचे सांगून हरदोईहून लखनौला आणलं. ती लखनौला पोहोचल्यावर तो तिला रस्त्याच्या कडेला सोडून पेट्रोल भरायचं असल्याचं सांगून निघून गेला. त्यानंतर ती दोन दिवस त्याच जागी उभी राहिली, पण मुलगा आला नाही. वृद्ध महिला खूप भिजली होती, त्यामुळे तिच्यावर उपचार करून जवळच्या वृद्धाश्रमात पाठवण्यात आले. तिच्या मुलाचा शोध सुरू असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.