तिला इंग्रजी बोलता येईना, त्याला हिंदी कळेना, अवघ्या ३ महिन्यात जोडप्याचं मोडलं लग्न
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 10:50 AM2024-04-15T10:50:07+5:302024-04-15T11:25:03+5:30
Marriage News: बदलतं समाजजीवन आणि जीवनशैलीबरोबर समाजात घटस्फोटांचं प्रमाण वाढलं आहे. मात्र कधी इंग्रजी बोलता न येत असल्याने कुणाचं लग्न मोडल्याचं तुम्ही ऐकलंय का? उत्तर प्रदेशमधील आग्रा येथून अशीच एक घटना समोर आली आहे.
बदलतं समाजजीवन आणि जीवनशैलीबरोबर समाजात घटस्फोटांचं प्रमाण वाढलं आहे. मात्र कधी इंग्रजी बोलता न येत असल्याने कुणाचं लग्न मोडल्याचं तुम्ही ऐकलंय का? उत्तर प्रदेशमधील आग्रा येथून अशीच एक घटना समोर आली आहे. त्यामध्ये पत्नीला इंग्रजी बोलता येत नसल्याने जोडप्याचा घटस्फोट झाल्याचं समोर आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे या जोडप्याची वर्षभरापूर्वी भेट झाली होती. त्यानंतर तीन महिन्यांपूर्वीच त्यांचं लग्न झालं होतं. मात्र त्यांचं नातं हे अल्पकालिन ठरलं आहे.
या जोडप्यामधील तरुण हा गुरुग्राममधील एका खासगी बँकेमध्ये नोकरी करतो. तो दक्षिण भारतातील रहिवासी आहे. त्यामुळे त्याला हिंदी बोलता येत नाही. तो वर्षभरापूर्वी ट्रेनिंगसाठी आग्र्याला आला होता. त्यानंतर त्याची आग्रा येथे राहणाऱ्या एका तरुणीशी भेट झाली होती. पुढे भेटीगाठी वाढल्या आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. तीन महिन्यांपूर्वी या दोघांचा विवाहही झाला. दरम्यान, तरुणीने सांगितले की, मागच्या १५ दिवसांपासन ती माहेरी राहत असल्याचेही सांगितले.
या तरुणीने पोलिसांना सांगितले की, तिचा पती इंग्रजीमध्ये बोलायचा. मात्र मला इंग्रजी बोलता येत नव्हती. त्यावरून घरात वाद व्हायचे. त्यातच घरामध्ये केवळ इंज्रजीमध्ये बोलायचं, अशी ताकिद पतीने या महिलेला दिली. त्यामुळे ही तरुणी त्रस्त झाली. तसेच हिंदीत बोलल्याच तिचा पती तिच्यासोबत अपमानास्पद वर्तन करायचा.
या प्रकरणी तरुणीने दिलेल्या तक्रारीनंतर कुटुंब कल्याण केंद्रामध्ये बोलावण्यात आले. तिथे त्याने सांगितले की, मी दक्षिण भारतातील आहे. तसेच हिंदी भाषा मला समजत नाही. मात्र घरात इंग्रजी बोलण्यााबबत त्यांचं एकमत होत नव्हतं. त्यानंतर या पतीने पत्नीला सोबत ठेवण्यास नकार दिला आहे.