धक्कादायक! धर्मशाळेच्या खोलीत एकाच कुटुंबातील चौघांनी संपवले जीवन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 09:20 AM2023-12-08T09:20:41+5:302023-12-08T09:22:44+5:30
दोन महिन्यांच्या भटकंतीनंतर हे कुटुंब वाराणसीत पोहोचले होते. त्यानंतर, येथील एका धर्मशाळेत त्यांनी एकत्रितपणे आत्महत्या केली.
उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे सामूहिक आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. एकाच कुटुंबातील ४ सदस्यांनी धर्मशाळेतील एका खोलीत आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्या केलेले सर्वजण आंध्र प्रदेशच्या ईस्ट गोदावरी जिल्ह्यातील रहिवाशी आहेत. मृत्यू झालेल्यांमध्ये आई-वडिलांसह दोन तरुण मुलांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पीडित कुटुंब आर्थिक तंगीत होतं, अशी प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.
दोन महिन्यांच्या भटकंतीनंतर हे कुटुंब वाराणसीत पोहोचले होते. त्यानंतर, येथील एका धर्मशाळेत त्यांनी एकत्रितपणे आत्महत्या केली. सामूहिक आत्महत्येच्या घटना गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढताना दिसून येत आहेत. याप्रकरणी वाराणसीतील दश्वामेध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवनाथपूर पांडेहवेली परिसरात आंध्र आश्रम म्हणून एक धर्मशाला आहे. येथील खोली नंबर एस-६ मध्ये हे कुटुंब वास्तव्यास होते. मात्र, गुरुवारी सायंकाळपर्यंत कुटुंबातील कोणीही खोलीतून बाहेर आले नाही, किंवा खोलीही उघडल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे, धर्मशाळेच्या व्यवस्थापकाला संशय आला. त्यानंतर, त्यांनी पोलिसांशी संपर्क साधत माहिती दिली. पोलिसांच्या समोर बंद खोली उघडली असताना सामूहिक आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला.
खोलीतील छतावर असलेल्या खुंटीला नायलॉनच्या रस्सीने फाशी घेत चौघांनीही आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली. त्यानंतर, पोलिसांनी तात्काळ फॉरेन्सिक लॅब व डॉग स्क्वॉडशी संपर्क साधला. कोंडा बाबू (50), लावण्या (45), राजेश (25) आणि जयराज (23) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. त्यामध्ये, पती-पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे. हे सर्वजण ३ डिसेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता वाराणसी येथे आले होते. काशी यात्रा करणार असल्याचे सांगत त्यांनी खोली बुक केली. आपण, ७ डिसेंबर रोजी सकाळी खोली खाली करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.
दरम्यान, पोलिसांना तेलुगू भाषेत लिहिलेली सुसाईड नोट घटनास्थळावरुन आढळून आली आहे. आंध्र प्रदेशातील स्थानिक ठिकाणी पैशावरुन त्यांचा वाद सुरू होता. त्यावरुन, ते त्रस्त होते. सुसाईड नोटमध्ये त्यांनी काहींची नावेही लिहिली आहेत. याप्रकरणी, पोलिस अधिक तपास करत असून आंध्र प्रदेश पोलिसांशी संपर्क साधण्यात येत आहे.