धक्कादायक! शिक्षकानेच रद्दीवाल्याला विकली शाळेतील नवी पुस्तकं, असा झाला उलगडा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 04:38 PM2023-08-08T16:38:38+5:302023-08-08T16:40:14+5:30
उत्तर प्रदेशच्या मिर्झापूर येथील एका शाळेत शिक्षकाने विद्यार्थ्यांची नवीन पुस्तके रद्दी दुकानात विकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
मिर्झापूर - सरकारकडून शिक्षणाला महत्त्व देत गरिबांच्या मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे, यासाठी विविध योजना राबविण्यात येतात. विशेष म्हणजे केंद्र सरकारने यापूर्वीच त्या अनुषंगाने शिक्षणाचा कायदाही केला आहे. तर, शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेश आणि पुस्कतेही वाटप केली जातात. कारण, हीच मुले देशाचं भविष्य असतात. समाजातील प्रत्येक घटकाला शिक्षणातून स्वत:ची प्रगती करण्याचा हक्क आहे. मात्र, सरकारच्या योजना अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारी प्रवृत्तीमुळे गरिबांना मिळत नाही. त्याचप्रमाणे शिक्षकाचा लालचीपणाही विद्यार्थ्यांना लाभ मिळवून देण्यात अडसर ठरतो.
उत्तर प्रदेशच्या मिर्झापूर येथील एका शाळेत शिक्षकाने विद्यार्थ्यांची नवीन पुस्तके रद्दी दुकानात विकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. काही रुपयांसाठी शिक्षकाने विद्यार्थ्यांवर एवढा मोठा अन्याय करत शिक्षकी पेशाला काळीमा फासली आहे. मिर्झापूर जिल्ह्यातील एका गावात शाळेतील शिक्षकाने यंदाच्या चालू वर्षातील म्हणजेच २०२३-२४ मधील पुस्तके रद्दीवाल्याकडे विकली. ग्रामस्थांना रद्दीवाल्याकडे नवीन रंगीबेरंगी पुस्तके पाहिल्यानंतर आश्चर्य वाटले.
ग्रामस्थांनी रद्दीवाल्याला रस्त्यात अडवून या नवीन पुस्तकांबद्दल माहिती विचारली. विशेष म्हणजे या पुस्तकावर सर्व शिक्षा अभियान, सब पढे-सब बढे... मुफ्त वितरण हेतू शैक्षणिक वर्ष २०२२-२३ असंही लिहिलेलं होतं. त्यामुळे गावकऱ्यांना संताप अनावर झाला. त्यावेळी, स्वत: शाळेतील शिक्षकानेच ही पुस्तके आपल्याला विकल्याचं रद्दीवाल्याने सांगितले. त्यानंतर, ग्रामस्थांनी रद्दीवाल्याकडून ती पुस्तके परत घेऊन शाळेत जमा केली.
मिर्झापूरच्या सदर तालुक्यातील बचटा प्राथमिक विद्यालयातील मुलांसाठी ही पुस्तके पुरविण्यात आली होती. मात्र, शाळेतील शिक्षकांनी पुस्तके रद्दीवाल्यास विकून त्याच्याकडून पैसे घेतले. तर, रद्दीवाल्यानेही एका दुकानदारास ही पुस्तके विकली होती. शिक्षणाचा असा झालेला बाजार-व्यापार पाहून ग्रामस्थांचा संताप अनावर झाला होता.