धक्कादायक! महिला न्यायाधीशाने चिठ्ठी लिहून संपवले जीवन; कलेक्टर, एसपी तातडीने आले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2024 11:45 AM2024-02-04T11:45:41+5:302024-02-04T12:04:45+5:30
ज्योत्सना राय यांच्या शासकीय निवासस्थानी सकाळी काम करण्यासाठी कर्मचारी आला होता.
बदायू - उत्तर प्रदेशच्या बदायू शहरातील एका महिला न्यायाधीशाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ज्योत्सना राय (२९) असे मृत न्यायाधीश महिलेचे नाव असून सिव्हील बारजवळील सरकारी निवासस्थानीच त्यांनी गळफास घेतला. या घटनेनंतर पोलिसांनी तत्काल घटनास्थळी धाव घेतली असून घराचा दरवाजा तोडून पोलिसांनी त्यांनी आतमध्ये प्रवेश केला. त्यावेळी, ज्योत्सना राय यांचे शव लटकल्याचे दिसून आले. दरम्यान, पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोटही आढळून आले आहे.
ज्योत्सना राय यांच्या शासकीय निवासस्थानी सकाळी काम करण्यासाठी कर्मचारी आला होता. त्यावेळी, त्याने आवाज देऊन, दरवाजा ठोठावूनही आतमधून कुठलाही प्रतिसाद आला नाही. त्यामुळे, संबंधित कर्मचारीने स्थानिक पोलीस व कोर्ट परिसरातील कर्मचाऱ्यांना बोलावले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन दरवाजा तोडला असता महिला न्यायालयाधीशाने फाशी घेतल्याचे दिसून आले. तसेच, त्यांच्या मृतदेहाजवळ एक सुसाईड नोटही आढळून आली आहे. विशेष म्हणजे २९ एप्रिल २०२३ रोजीच या न्यायाधीश अयोध्या येथून बदली होऊन बदायुला आल्या होत्या.
वयाच्या २४ व्या वर्षी ज्युनियर डिव्हीजन जजची परीक्षा उत्तीर्ण होऊन ज्योत्सना राय न्यायाधीश बनल्या होत्या. त्यानंतर, १५ नोव्हेबर २०१९ रोजी त्यांची पहिली पोस्टींग अयोध्या येथे झाली होती. ज्योत्सना ह्या मूळ मऊ जिल्ह्यातील रहिवाशी आहेत. त्यांच्या मृत्यूचे वृत्त समजतात त्यांच्या आई-वडिलांनीही येथील शासकीय निवासस्थानी धाव घेतली होती. त्यांचे वडिलही सरकारी अधिकारी होते, जे बदायू येथून सेवानिवृत्त झाल्यानंतर, ते लखनौ येथे स्थायिक झाले होते.
न्यायाधीश आवासच्या क्रमांक ४ येथील पहिल्याच मजल्यावर ज्योत्सना राहत होत्या. पोलिसांना याच घरात सुसाईड नोट आढळून आली आहे. या घटनेनंतर जिल्हा न्यायाधीश पंकज अग्रवाल, जिल्हाधिकारी मनोज कुमार, एसएसपी अलोक प्रियदर्शी यांच्यासह अनेक अधिकारी घटनास्थळी पोहोचले होते. एसएसपी अलोक प्रियदर्शी यांनी घटनेची माहिती देत, पोलिसांकडून सर्वोतोपरी तपास करण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच, तपासानुसार कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
एक और होनहार बेटी, सरकारी सिस्टम की भेंट चढ़ गई। उत्तर प्रदेश के बदायूँ में महिला जज ज्योत्सना राय ने अपने सरकारी आवास में फांसी लगाकर ख़ुदकुशी कर ली।
— Alka Lamba 🇮🇳 (@LambaAlka) February 4, 2024
कुछ महीनों पहले ही इस बेटी ने, अपना शारीरिक शोषण करने वाले दोषियों के खिलाफ कोई कार्रवाई नहीं होने पर CJI को पत्र लिख कर… pic.twitter.com/mJPZyea5mN
दरम्यान, काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी ट्विट करुन, देशाची एक कर्तबगार कन्या सिस्टीमचा बळी ठरली, असे म्हटले. तसेच, काही महिन्यांपूर्वीच या महिला न्यायाधीशांनी लैंगिक शोषणाचा आरोप करत, सरन्यायाधीशांकडे आत्महत्या करण्याची परवानगी मागितली होती, अशी माहिती देत, पत्रातील काही मजकूरही शेअर केला आहे.