बहिणीचा मृतदेह पाठीवर बांधून घरी नेला, रुग्णालयातील व्हिडिओ व्हायरल; नेटीझन्सचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 04:15 PM2023-11-08T16:15:11+5:302023-11-08T16:17:05+5:30
बिधूना नगरमधील किशनी रोडच्या नवीन बस्ती येथील ही घटना असून या घटनेनमुळे सोशल मीडियातून तीव्र संताप व्यक्त होत आहे
उत्तर प्रदेशमधील एक ह्रदयद्रावक आणि प्रशासकीय यंत्रणांवर संताप व्यक्त करणारी घटना उघडकीस आली आहे. माणुसकीला काळीमा फासणारा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियातून समोर आला. ज्यामध्ये, एक तरुण रुग्णालयातून आपल्या बहिणीचा मृतदेह घरी नेताना दिसत आहे. विशेष म्हणजे दुचाकीवर भावाने बहिणीचा मृतदेह पाठिला बांधल्याचे दिसून येते. तर, मृतदेहाच्या पाठिमागे आणखी एक मुलगी तो मृतदेह धरुन बसली आहे. काळीज पिळवटून टाकणारा आणि तितकाच संतापजनक हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने स्पष्टीकरण दिलं आहे.
बिधूना नगरमधील किशनी रोडच्या नवीन बस्ती येथील ही घटना असून या घटनेनमुळे सोशल मीडियातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. येथील १९ वर्षीय अंजली विद्युत करंट लागल्याने बेशुद्ध पडली होती. त्यामुळे, कुटुंबीयांना तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात नेण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. रुग्णालयात डॉक्टरांनी अंजलीला मृत घोषित केले.
रुग्णालय प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, मृत अंजलीच्या कुटुंबीयांनी शवविच्छेदन करु इच्छित नव्हते. त्यामुळे, हॉस्पीटल प्रशासनाला न सांगताच तिचा मृतदेह दुचाकीवरुन घरी नेला. याबाबत रुग्णालय प्रशासनाला नंतर माहिती मिळाली. तर, अंजलीच्या कुटुंबीयांनीही हॉस्पीटल प्रशासनाने दिलेले स्पष्टीकरण मान्य केलं असून स्वत:च्या मर्जीनेच तिचा मृतदेह घरी नेल्याचे कबुल केले. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून नेटीझन्सने संताप व्यक्त केला आहे. तसेच, आरोग्य विभागाच्या बेजबाबदारपणाला दोषी धरलं जात आहे. हॉस्पीटलने रुग्णावाहिका द्यायला पाहिजे होती, असेही नेटीझन्सने म्हटलं आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी घटनेची दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. संबंधितांवर कारवाई करण्याचेही निर्देश त्यांनी दिले आहेत.