निमंत्रितांना देणार माती, मिठाई अन् तुळशीचे पान; ‘गीताप्रेस’ने भेट देण्यासाठी पाठवले शेकडो धार्मिक ग्रंथ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 12:07 PM2024-01-19T12:07:04+5:302024-01-19T12:07:27+5:30
गीताप्रेस या धार्मिक पुस्तकांचे वर्षानुवर्षे प्रकाशन करणाऱ्या संस्थेने निमंत्रितांसाठी भेट म्हणून धार्मिक ग्रंथ पाठविले आहेत.
अयोध्या : प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी भारतासह जगभरातील आठ ते दहा हजार मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. राम मंदिराची उभारणी करतेवेळी पाया खोदताना जी माती काढली गेली ती प्रसाद म्हणून राम मंदिर ट्रस्टकडून निमंत्रितांना दिली जाणार आहे.
गीताप्रेस या धार्मिक पुस्तकांचे वर्षानुवर्षे प्रकाशन करणाऱ्या संस्थेने निमंत्रितांसाठी भेट म्हणून धार्मिक ग्रंथ पाठविले आहेत. निमंत्रितांना १०० ग्रॅमचा मोतीचूर लाडू आणि तुळशीचे पान एका बॉक्समध्ये दिले जाईल. दुसऱ्या बॉक्समध्ये राम मंदिराची माती, शरयू नदीच्या पाण्याची बाटली असेल.
धोतीपासून बिंदीपर्यंत
श्रीराम मंदिरासाठी अनेकजण भेटवस्तू देत आहेत. रामासाठी धोती, पँट-शर्ट तर सीतामाईसाठी बांगड्या, बिंदी, कानातले डुल भेट म्हणून दिले जात आहेत.
मुस्लीम बांधवांकडूनही स्वागताची जय्यत तयारी
प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या स्वागतासाठी मुस्लीम बांधवही उत्साहित आहेत. मशिदीला रंगरंगोटी, रोषणाई केली आहे. १०० मुस्लीम बांधव सोहळ्यात मिठाई वाटप करणार आहेत.
जागोजागी भोजनदान
राम मंदिरात दर्शनासाठी आगामी काही दिवस मोठ्या प्रमाणात भक्त येणार आहेत. त्यासाठी जागोजागी अन्न शिजवून भोजनदान केले जाणार आहे. अशाच एका भोजनदान केंद्रासाठी अयोध्येतील नागरिक नूर आलम यांनी त्यांची स्वत:ची जागा दिली आहे.