प्यारवाली लव्हस्टोरी! कॉफी शॉपवर प्रेम, भाषेची अडचण पण...; दक्षिण कोरियाची तरुणी यूपीची सून
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 12:16 PM2023-08-22T12:16:43+5:302023-08-22T12:17:55+5:30
चार वर्षांपूर्वी सुखजीत दक्षिण कोरियात कामासाठी गेला होता. कॉफी शॉपमध्ये काम करत असताना तो एका मुलीच्या प्रेमात पडला.
प्रेमासाठी लोक काहीही करायला तयार होतात. अशीच एक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथील सुखजीतने ही गोष्ट पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. चार वर्षांपूर्वी सुखजीत दक्षिण कोरियात कामासाठी गेला होता. कॉफी शॉपमध्ये काम करत असताना तो एका मुलीच्या प्रेमात पडला. त्यानंतर चार महिन्यांत या तरुणाने दक्षिण कोरियाची भाषा शिकून घेतली. 4 वर्षांनंतर आता दोघेही लग्नाच्या बंधनात अडकले आहेत. दोघांची प्रेमकहाणी खूपच रंजक आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण कोरियाची किम-बोह-नी शुक्रवारी पुवायां तहसीलमधील उदना गावात राहणाऱ्या सुखजीत सिंगची वधू बनली. सुखजीतचे वडील बलदेव सिंग हे शेतकरी आहेत. आई हरजिंदर कौर गृहणी आहे. सुखजीतचा धाकटा भाऊ जगजीत सिंग, जो शेतीत त्याच्या वडिलांना मदत करतो. 28 वर्षीय सुखजित सिंग चार वर्षांपूर्वी कामाच्या शोधात दक्षिण कोरियाला गेला होता.
बुसानमधील एका कॉफी शॉपमध्ये तो काम करू लागला. त्याच वेळी, डेगूची 30 वर्षीय किम-बोह-नी बिलिंग विभागात काम करायची. सुखजीत सांगतो की दोघेही काम करताना प्रेमात पडले. मात्र, त्याच्या आणि किममध्ये भाषेची समस्या होती. मग दोन-चार महिन्यांत तिथली भाषा शिकून घेतली. त्यानंतर कुटुंबीयांच्या परवानगीने तो 4 वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागला.
यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. चार महिन्यांपूर्वी तो घरी परतला. दुसरीकडे, दोन महिन्यांपूर्वी किमही 3 महिन्यांच्या टुरिस्ट व्हिसावर तिच्या मैत्रिणीसोबत दिल्लीला पोहोचली होती. यानंतर ती तेथून शाहजहांपूरला आली. 18 ऑगस्ट रोजी पुवायन येथील गुरुद्वारा नानक बाग येथे दोघांनी लग्नगाठ बांधली. सुखजीत म्हणाला की, त्याची पत्नी किम हिला भारताचा 5 वर्षांचा व्हिसा मिळाला आहे.
सुखजीतने सांगितले की, त्याची पत्नी 3 महिन्यांसाठी भारतात आली आहे. त्याला उदना गावात राहून 2 महिने पूर्ण झाले आहेत. आता लग्न झाले आहे, त्यामुळे 1 महिना उदनामध्ये राहण्याचा प्लान आहे. त्यानंतर ती दक्षिण कोरियाला परतणार आहे. त्यानंतर ती पुन्हा भारतात येईल. नंतर आम्ही दोघे दक्षिण कोरियाला जाऊ आणि पुढचा प्लॅन दक्षिण कोरियातच स्थायिक होण्याचा आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे