प्रयागराजमध्ये महाबोधी एक्सप्रेसवर दगडफेक, अनेक प्रवासी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 09:01 AM2024-09-24T09:01:35+5:302024-09-24T09:03:14+5:30
महाबोधी एक्स्प्रेसवर रात्री उशिरा काही लोकांनी दगडफेक केली. प्रयागराजमध्ये झालेल्या दगडफेकीत अनेक प्रवासी जखमी झाले आहेत.
उत्तर प्रदेशमध्येरेल्वे ट्रॅकवर कट रचणाऱ्या गुन्हेगारांना पकडण्यात येत आहे. या गुन्हेगारांच्या विरोधात कारवाई सुरू आहे. दरम्यान, सोमवारी रात्री रेल्वेवर दगडफेक झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. नवी दिल्लीहून बिहारमधील गयाकडे जाणाऱ्या महाबोधी एक्सप्रेस ट्रेनवर दगडफेक केली.
रात्री साडेनऊच्या सुमारास प्रयागराज जंक्शनहून गयाकडे निघालेल्या या दुर्घटनेत अनेक प्रवासी जखमी झाले, यमुना पुलापूर्वीच रेल्वेवर जोरदार दगडफेक सुरू झाली.
बदलापूरनंतर युपीमध्येही गुन्हेगाराचा एन्काऊंटर; ट्रेनमधून कॉन्स्टेबलला फेकणारा गुन्हेगार ठार
सुमारे ५० ते ६० दगड रेल्वेवर पडल्याची माहिती समोर आली. एस-३ कोचच्या खिडकीतूनही अनेक दगड पडले, त्यामुळे अनेक प्रवासी जखमी झाले. डब्यात आरडाओरडा झाला. लोको पायलटने ट्रेन थांबवली. यानंतर आरपीएफ जवानांनी शोध सुरू केल्यानंतर आरोपींनी पळ काढला.
माहिती मिळताच प्रयागराज जंक्शन येथील आरपीएफ उपनिरीक्षक एसपी सरोज फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले, मात्र तोपर्यंत ट्रेन निघून गेली होती. आरपीएफ पथकाने शोधमोहीम राबवून तीन संशयितांना ताब्यात घेतले. मिर्झापूर स्थानकात गाडी थांबवण्यात आली. याठिकाणी जबाब नोंदवण्यासोबतच जखमी प्रवाशांवर उपचार करण्यात आले.
बेगुसराय येथील रहिवासी जखमी प्रवासी सुजित कुमार यांनी सांगितले की, ते खिडकीजवळ बसले असताना अचानक दगडफेक सुरू झाली. त्यांच्या डोक्याला व मानेला गंभीर दुखापत झाली. इतर अनेक प्रवाशांनाही गंभीर दुखापत झाली आहे.