१३ वर्षांनी आनंदाश्रू; मजुरी करणाऱ्या आईची लहानपणी हरवलेली दोन्ही मुलं परत आली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 04:02 PM2023-12-28T16:02:15+5:302023-12-28T16:25:38+5:30
सन २०१० साली जगदीशपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परिसरातून राखी आणि बबलू गायब झाले होते.
उत्तर प्रदेशच्या आग्रा येथे राहणारे एक भाऊ-बहिण लहानपणीच आपल्या आई-वडिलांपासून हरवले होते. आता, तब्बल १३ वर्षांनी ते आपल्या कुटुंबाकडे परत आले आहेत. यासाठी एका स्वयंसेवी संस्थेने त्यांना मदत केली. लहानपणीच आपल्यापासून दूर गेलेल्या मुलीला पाहताच आईच्या अश्रूंचा बांध फुटला. आईने लेकीचा मिठी मारत आनंदाश्रू ढाळले, तर मुलीचेही डोळे पाणावले. चित्रपटाला साजेल असे हे दृश्य पाहून उपस्थितही भावूक झाले होते.
सन २०१० साली जगदीशपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परिसरातून राखी आणि बबलू गायब झाले होते. जेव्हा हे दोघे कुटुंबापासून दूर गेले, तेव्हा राखीचे वय ९ वर्षे तर बबलूचे वय ६ वर्षे होते. ज्यादिवशी ही घटना घडली, त्यादिवशी राखीची आई नितू कामावर गेली होती. कामाहून घरी आल्यानंतर काहीतरी विषयावरुन मुलांसोबत तिचे भांडण झाले, तिने मुलांना मारहाणही केली. त्यानंतर, आई बाहेर निघून गेली. मात्र, ती घरी आल्यानंतर तिचे दोन्ही मुले घरात नव्हते. त्यामुळे, तिने परिसरात शोधा-शोध केली, इकडे तिकडे पाहिले. पण, त्यांचा शोध लागला नाही.
नीतू दोन दिवस उपाशी राहिल्या, देवाची प्रार्थना केली, सगळीकडे पाहिले. मात्र, त्यांची दोन्ही मुले परत आली नाहीत. पोलिसांकडे मुले हरवल्याची तक्रार दिली. पण, पोलिसांनाही ही मुले शोधण्यात अपयश आलं. या घटनेने नीतू आणि तिच्या पतीला मोठा मानसिक धक्का बसला होता. दिल्ली, नोएडासह इतरही ठिकाणी त्यांनी आपलं काम सोडून मुलांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. या शोधमोहिमेत तब्बल १३ वर्षे गेली.
दुसरीकडे मुलेही मोठी होत होती अन् आई-वडिलांचा शोध घेत होते. घरातून दूर गेल्यानंतर ते एका अनाथालयात राहिले. येथूनच त्यांनी शिक्षण घेतले, आणि खासगी नोकरीही सुरू केली. सध्या राखी गुरुग्राममध्ये शॉपर्स स्टाफ म्हणून काम करते. तर, बबलू बंगळुरूच्या एका कंपनीत पॅकिंगचं काम करतो. दोघेही भाऊ-बहिण पहिल्यापासूनच एकमेकांच्या संपर्कात आहेत. दरम्यान, बललूची भेट एका बाल सुरक्षा अधिकारी कार्यकर्त्यासोबत झाली. त्या नरेश पारस यांनी दोघांची भेट त्यांच्या आई-वडिलांसोबत करुन देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
दोन महिन्यांपूर्वी राखी व बबलू यांनी एका एनजीओच्या माध्यमातून पारस यांच्याकडे मदत मागितली होती. ज्या स्टेशनपासून ते गायब झाले होते, त्या स्टेशनच्याबाहेर डमी रेल्वेचं इंजिन ठेवण्यात आलं होतं, एवढीच काय ती १३ वर्षांपूर्वीची आठवण होती. त्यावरुन, हे दोघेही आग्रा येथील असल्याच निश्चित झाले. कारण, आग्रा रेल्वे स्टेशन बाहेरच डमी इंजिन ठेवण्यात आले आहे. त्यानुसार, आग्र्यातून शोधमोहिम सुरू झाली होती. एका बालकल्याण समितीला ट्रेनमधून हे दोघेही सापडले होते. त्यावरुन, त्यांची माहिती घेत, अनेक पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पारस यांनी मिसिंग तक्रारीची माहिती घेतली. त्यावेळी, जगदीशपुरा पोलीस ठाण्यात १३ वर्षांपूर्वी बहिण-भाऊ हरवल्याची तक्रार दाखल झाल्याचं त्यांनी सांगितलं.
पारस यांच्यासह राखी आणि बबलूने आई नीतूचा शोध सुरू केला. मात्र, नितूनेही तेथील भाड्याचं घर सोडून शहरात बस्तान मांडलं होतं. जगदीशपुरा येथील स्थानिकांकडून नीतूचा शाहगंज येथील पत्ता मिळाला. त्यानुसार, एनजीओचे लोक नीतूच्या घरी पोहोचले आणि राखी व बबलूसोबत व्हिडिओ कॉलवरुन संवाद झाला. सर्वांनाच अत्यानंद झाला होता. राखीने आग्र्यात येऊन आईची भेट घेतली, आईनेही आरती ओवाळून लेकीचं स्वागत केलं. तब्बल १३ वर्षांनी आईला तिची दोन्ही चिमुकले परत भेटले, जे आता मोठे झाले होते.