डोळ्यांचे पारणे अखेर फिटले, रामलला मूर्तीचे दर्शन झाले, अयाेध्येतील मंदिरात प्रतिष्ठापित हाेणाऱ्या मूर्तीचे अनावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 06:30 AM2024-01-20T06:30:07+5:302024-01-20T06:30:58+5:30
काळ्या पाषाणापासून बनविलेल्या या मूर्तीचे मनमोहक रूप पाहून रामभक्तांचे मन तृप्त झाले.
अयोध्या : भए प्रगट कृपाला दीनदयाला कौसल्या हितकारी। हरषित महतारी मुनि मन हारी अद्भुत रूप बिचारी॥ श्रीरामचरितमानसमधील प्रभू श्रीरामाचे वर्णन करणाऱ्या या छंदाची प्रचिती तमाम रामभक्तांना शुक्रवारी आली जेव्हा अयोध्येच्या राममंदिरातील रामलल्लाच्या मूर्तीचे अनावरण २२ जानेवारी रोजी होणाऱ्या ‘प्राणप्रतिष्ठा’ सोहळ्याच्या तीन दिवस आधी करण्यात आले.
काळ्या पाषाणापासून बनविलेल्या या मूर्तीचे मनमोहक रूप पाहून रामभक्तांचे मन तृप्त झाले. म्हैसूरचे शिल्पकार अरुण योगीराज यांनी रामलल्लाची ही ५१ इंची मूर्ती साकारली आहे. अभिषेक सोहळ्याचे प्रमुख आचार्य अरुण दीक्षित यांनी सांगितले की, दुपारी वैदिक मंत्रोच्चारात भगवान रामांची मूर्ती गर्भगृहात ठेवण्यात आली. ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा यांच्या हस्ते ‘मुख्य संकल्प’ करण्यात आला.
रामलल्लाच्या तात्पुरत्या मंदिरातील दर्शन सायंकाळपासून थांबवण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळी अरणिमंथनातून अग्नी प्रदीप्त करण्यात आला. त्याआधी गणपती इत्यादी स्थापित देवतांची पूजा, आदी विधी झाले.