अयोध्यानगरीचे रूपडे पालटणार, विविध विकासकामांसाठी सरकारकडून २३ कोटींचा निधी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 06:31 AM2023-11-27T06:31:05+5:302023-11-27T06:32:05+5:30
Ayodhya Development Works: अयोध्येच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने अयोध्या धामला जोडणाऱ्या सर्व ६ राष्ट्रीय महामार्गांपूर्वी १५ किलोमीटर अंतरावर पर्यटन सुविधा केंद्र बांधण्यासाठी सरकारकडून २३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
- त्रियुग नारायण तिवारी
अयोध्या - अयोध्येच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने अयोध्या धामला जोडणाऱ्या सर्व ६ राष्ट्रीय महामार्गांपूर्वी १५ किलोमीटर अंतरावर पर्यटन सुविधा केंद्र बांधण्यासाठी सरकारकडून २३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
प्रादेशिक पर्यटन अधिकारी आर. पी. यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार लखनौ, रायबरेली, आंबेडकरनगर आणि सुलतानपूर महामार्गावर पर्यटन सुविधा केंद्रांच्या उभारणीचे काम सुरू झाले आहे. बस्ती गोरखपूर मार्ग आणि गोंडा मार्गावर अद्याप जमीन खरेदी झालेली नाही.
अयोध्येत येणाऱ्या भाविक आणि पर्यटकांच्या सोयीसाठी अयोध्येपूर्वी १५ किलोमीटर अंतरावरील सर्व महामार्गांवर प्रवेशद्वार बांधण्याची योजना सुरू असून, त्यावर काम सुरू झाले आहे. ही संपूर्ण योजना डिसेंबर २०२४पर्यंत पूर्ण केली जाईल. हे सर्व प्रवेशद्वार वेगवेगळ्या नावांनी ओळखले जातील आणि तेथे सुविधा केंद्र, बाजारपेठ, दुकानांचे बांधकाम, पार्किंग व्यवस्था, प्रवाशांसाठी निवासाची सोय आणि प्रादेशिक भागात मनोरंजनाची साधनेही उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
प्राणप्रतिष्ठेआधी विमानतळ होणार सुरू
- अयोध्येत उभारले जात असलेले प्रभू श्रीराम विमानतळ प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या आधी सुरू करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात देशांतर्गत विमाने सुरू केली जाणार असून ती दिल्ली, अहमदाबाद, मुंबईसाठी असतील.
- विमानतळाचे संचालक विनोद कुमार यांनी सांगितले की, देशांतर्गत विमानांसाठी टर्मिनलचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. सुरक्षा तपासणी, दुकानांची व्यवस्था केली जात आहे. अशा स्थितीत डिसेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत विमाने सुरू
करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.