धक्कादायक! पोलिस हवालदाराने स्वत:ला पेटवून केला ठाण्यात प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2023 07:41 PM2023-09-02T19:41:14+5:302023-09-02T19:43:04+5:30
आरोपी पोलीस शिपायाने पोलीस स्टेशनबाहेर स्वत:ला जाळून घेतले आणि चौकीत प्रवेश केला.
लखनौ - उत्तर प्रदेशच्या मिर्झापूर येथील एका पोलिस चौकीवर तैनात असलेल्या पोलीस हवालदारावर महिलने गंभीर आरोप केले होते. आपल्यासोबत अवैध शारिरीक संबंध बनवण्यासाठी या महिलेवर हवालदाराने दबाव टाकला. तसेच महिलेला सातत्याने मानिसक त्रास देण्यात येत असल्याचा आरोपही महिलेने केला होता. याप्रकरणी महिलेच्या मुलाने पोलीस ठाण्यात हवालादाविरुद्ध तक्रारही दाखल केली होती. या तक्रारीनंतर हवालदाराने आपली चूक मान्यही केली. मात्र, त्यानंतर त्याने केलेलं कृत्य पाहून सगळेच अवाक् झाले.
आरोपी पोलीस शिपायाने पोलीस स्टेशनबाहेर स्वत:ला जाळून घेतले आणि चौकीत प्रवेश केला. या घटनेनं पोलीस दलात खळबळ उडाली असून त्यांना उपचारासाठीी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांकडून पुढील कारवाई सुरू आहे. गैपुरा पोलीस स्टेशनमधील ही घटना आहे. येथील चौकीत तैनात असलेल्या सुरेश गौतम यांच्याविरुद्ध पीडित महिलेच्या मुलाने तक्रार दिली होती. गौतम यांच्याकडून माझ्या आईला त्रास देण्यात येत होता. आईचे आधार कार्डही त्यांच्याकडेच असल्याचं या फिर्यादीत म्हटलं होतं.
गैपुरा पोलीस ठाण्याच्या प्रमुखांकडे ही फिर्याद दाखल करण्यात आली. त्यानंतर, पोलीस प्रमुखांनी सुरेश गौतम यांना बोलावून चौकशी केली असता त्यांनी आरोप मान्य केले आहेत. तसेच, आधार कार्ड घरी असून मी परत करेन, असेही त्यांनी म्हटलं. त्यासाठी पोलीस चौकीतून बाहेर पडल्यानंतर आरोपी गौतम यांनी स्वत:ला आग लावून घेतली. त्यानंतर, पोलीस ठाण्यात प्रवेश केला, या घटनेने पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली होती. सहकारी पोलिसांनी गौतम यांची आग विझवून त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना मिर्झापूर येथून वाराणसीला रेफर करण्यात आलं आहे.