तिघांनी कार चोरली, पण तब्बल १० किमी ढकलत नेली; अखेर आरोपींना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 11:37 AM2023-05-24T11:37:03+5:302023-05-24T11:39:29+5:30
चोरट्यांनी मारुती व्हॅन चोरुन चक्क १० किमीपर्यंत धक्का देत पुढे नेली आणि एका शांत, निर्मनुष्य ठिकाणी उभी केली.
कानपूर - चोरी करताना चोरटे डोकं लावून, योजना आखत आपला डाव साधत असतात. या कामात चोरटे अट्टल असतात. पोलिसांपासून आपला बचाव व्हावा, पोलिसांना आपला सुगावा लागू नये याची काळजी घेत असतात. मात्र, एका चोरी प्रकरणात चोरट्यांना गाडी चालवता न येणे अंगलट आले. कानपूरमधील या चोरीची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. तीन चोरट्यांनी चोरी करण्याच्या उद्देशाने एक चारचाकी गाडी चोरली. मात्र, तीन जणांपैकी एकालाही ती गाडी चालवता येत नसल्याने चक्क १० किमीपर्यंत धक्का मारत ती गाडी पुढे नेली.
चोरट्यांनी मारुती व्हॅन चोरुन चक्क १० किमीपर्यंत धक्का देत पुढे नेली आणि एका शांत, निर्मनुष्य ठिकाणी उभी केली. कानपूरच्या नजीराबाद पोलिसांनी या चोरीप्रकरणातील तिघांनाही अटक केली आहे. अटकेनंतरच या घटनेचा खुलासा झाला. ७ मे रोजी दबौली परिसरातून तीन जणांनी मारुती व्हॅनची चोरी केली होती, अशी माहिती नजीराबादचे एसपी भेज नारायण सिंह यांनी दिली.
सत्यम कुमार, अमन गौतम आणि अमित वर्मा अशी तीन आरोपी चोरट्यांची नावे आहेत. सत्यम हा महाराजपूरच्या इंजिनिअरींग कॉलेजमधून बीटेक करत आहे. अमन डीबीएस कॉलेजमधून बीकॉमच्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थी आहे. तर, अमित हा एका बिल्डींगमध्ये काम करतो.
एसपी सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, या तिघांनी कारची चोरी केली, पण तिघांपैकी एकालाही गाडी चालवायला येत नव्हती. त्यामुळे, त्यांनी दबौली येथून १० किमीपर्यंत कल्याणपूर येथे धक्का मारत गाडी आणली. त्यानंतर, गाडीचा नंबर बदलून एका बाजुला कोपऱ्यात उभी केली. गाडी चालवता येत नसल्याने या तिघांनी ही गाडी भंगारवाल्याला विकायचे ठरवले होते. या तिघांपासून पोलिसांनी दोन चोरीच्या सायकलीही जप्त केल्या आहेत. अमितनेच या चोरीची योजना बनवली होती. तर, सत्यमने चोरीची गाडी विकण्यासाठी वेबसाईटही बनवली होती. जर गाडी सहजासहजी विकली नाही, तर ती वेबसाईटच्या माध्यमातून विकायची, योजना त्यांची होती.