लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2024 12:28 PM2024-06-16T12:28:28+5:302024-06-16T12:30:14+5:30
आपल्या लेकींचे लग्न आपल्या डोळ्यादेखत व्हावे अशी इच्छा मरणाच्या दारात टेकलेल्या वडिलांची होती.
मुलगी आणि वडिलांचे नाते काहीसे वेगळेच असते. आपल्या लेकींचे लग्न आपल्या डोळ्यादेखत व्हावे अशी इच्छा मरणाच्या दारात टेकलेल्या वडिलांची होती. आयसीयूमध्ये दाखल असलेल्या या व्यक्तीच्या मुलींच्या लग्नासाठी रुग्णालयात परवानगी मागितली असता, रुग्णालय व्यवस्थापनानेही नकार दिला नाही. मग त्यांच्या दोन्ही मुलींचे आयसीयूमध्ये दाखल असलेल्या वडिलांसमोर आयसीयू वॉर्डमध्ये लग्न झाले. डॉक्टर आणि परिचारिका सगळेच या खास क्षणाचे साक्षीदार झाले. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथील या घटनेने सर्वांचे लक्ष वेधले.
मोहम्मद इक्बाल हे आजाराने ग्रस्त असल्याने आयसीयूमध्ये आहेत. त्यांच्या दोन मुली आहेत, ज्यांच्या लग्नाची तारीख आधीच ठरलेली होती. पण, इक्बाल यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. वडील आजारी असल्याने ते लग्नाला उपस्थित राहू शकत नाहीत असे डॉक्टरांनी सांगितले. मग वडिलांच्या अनुपस्थित लग्न करण्यास दोन्ही मुलींनी नकार दिला. पण, त्यांच्या नातेवाईकांनी संबंधित रुग्णालय व्यवस्थापनाकडे मुलींचे लग्न आयसीसी वॉर्डमध्ये करण्यासाठी परवानगी मागितली.
'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
दरम्यान, इक्बाल यांच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांशी चर्चा केली असता मार्ग निघाला. डॉक्टरांनीही माणुसकीचे उदाहरण ठेवत लग्नासाठी परवानगी दिली. परवानगी मिळताच वधू वरांना रूग्णालयात आणून इक्बाल यांच्यासमोर विवाहसोहळा पार पडला. इरा मेडिकल कॉलेजच्या आयसीयू वॉर्डमध्ये वडिलांसमोर दोन्ही मुली विवाहबंधनात अडकल्या. दोन्ही लेकींचे लग्न डोळ्यासमोर होत असल्याचे पाहून ५१ वर्षीय इक्बाल यांना आनंदाश्रू आले.
दोन्ही लग्न पार पडताच इक्बाल यांच्या कुटुंबीयांनी रूग्णालय प्रशासनाचे आभार मानले. इक्बाल यांच्यावर अजूनही आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंतानजनक असली तरी त्यांना आपल्या दोन मुलींच्या लग्नाला उपस्थित राहता आले याचा आनंद आहे. या अनोख्या लग्नाची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. अनेकांनी या रूग्णालय प्रशासनाचे कौतुक केले.