हिंदू नावाचा कोणताही धर्म नाही, ही निव्वळ फसवणूक; माजी मंत्र्यांच्या विधानाने वाद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 02:31 PM2023-08-28T14:31:13+5:302023-08-28T14:31:39+5:30
"हिंदू धर्म जर या समाजात असता तर..."
Controversial Statement about Hindu Religion: "हिंदू नावाचा कोणताही धर्म नाही. हिंदू धर्म ही केवळ फसवणूक आहे. ब्राह्मण धर्माला हिंदू धर्म म्हणण्याचा हा डाव आहे", असे वादग्रस्त विधान उत्तर प्रदेशचे माजी मंत्री आणि सपा नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी केले. लखनौमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. "हिंदू धर्म असता तर आदिवासींनाही आदर मिळाला असता. सर्व विषमतेचे कारण ब्राह्मणवाद आहे. दलित आणि आदिवासींना जाळ्यात अडकवण्याचा हा प्रयत्न आहे. ब्राह्मणवादाची मुळे खूप खोलवर रूजवलेली आहेत. हिंदू धर्म असता तर या समाजात मागासलेल्यांचा सन्मान झाला असता, पण आदिवासी समाजातून येणाऱ्या राष्ट्रपतींना मंदिरात जाण्यापासून रोखले जाते ही तर मोठी शोकांतिका आहे", असेही ते म्हणाले.
"महामना रामस्वरूप वर्मा जी के जन्म शताब्दी समारोह के अवसर पर आइये हम सभी उनके सपनों को साकार करने का संकल्प लेकर जायें" pic.twitter.com/rLCfcUxPmo
— Swami Prasad Maurya (@SwamiPMaurya) August 28, 2023
स्वामी प्रसाद मौर्य यांनी सोमवारी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ ट्विट केला. चार मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये मौर्य हिंदू धर्माच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसले. "द्रौपदी मुर्मू जी राष्ट्रपती झाल्यानंतरही त्यांना मंदिरात जाण्यापासून रोखण्यात आले, कारण त्या आदिवासी समाजातील आहेत. आदिवासी समाज हिंदू असता तर त्यांना अशी वागणूक दिली असती का? ब्राह्मण देवतांचे चतुर लोक अजूनही आम्हाला आदिवासीच मानतात. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याबाबतही असेच घडले आहे. ज्याला तुम्ही हिंदू धर्म म्हणता, तुमचे सर्वस्व अर्पण करता, हिंदू-मुस्लीम असे वाद होऊन दंगली करता, रक्त सांडता, ते केवळ तुमचे अज्ञान आहे," असे मौर्य म्हणाले.
मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान गंगाजलाने धुण्याबाबत...
'जेव्हा अखिलेश यादव मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाले, तेव्हा या सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान गोमूत्राने धुतले. एवढ्यानेही मन तृप्त झाले नाही, तेव्हा घराला गंगाजलाने आंघोळ घालण्यात आली. एखाद्या ब्राह्मण मुख्यमंत्री असता तर त्यानंतर घराला गोमूत्र आणि गंगाजलाने धुण्याची हिंमत कुणाची असती का? अखिलेश यादव यांचा जन्म मागासलेल्या समाजात झाल्यामुळे त्यांच्याबाबत असे करण्यात आले. आदिवासी-दलित आणि मागास हे कोण आहेत, ज्यांना पूर्वी शूद्र म्हटले जात होते. त्यांना प्राण्यांपेक्षाही वाईट जीवन जगण्यास भाग पाडले जात होते. त्यामुळे सावध राहा, तुम्ही ज्याला धर्म मानता तो त्यांचा व्यवसाय आहे. त्यांच्यासाठी व्यवसाय म्हणजे तुमची फसवणूक आहे", असेही ते म्हणाले.