CM पदावरून योगी आदित्यनाथांना हटवण्याची होती तयारी, पण...?; पुस्तकात मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 01:29 PM2024-06-19T13:29:52+5:302024-06-19T13:30:51+5:30
लोकसभा निवडणुकीच्या निकालात यंदा भाजपाला उत्तर प्रदेशात अपेक्षित यश मिळालं नाही. त्यातच योगी आदित्यनाथ यांच्याबाबत अनेक वावड्या राज्यात उठत आहेत.
लखनौ - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी जेलमधून बाहेर आलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रचारात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबाबत मोठं विधान केले होते. पुढील निवडणुकीत योगी आदित्यनाथ यांना बाजूला सारलं जाणार असा दावा केजरीवालांनी केला होता. त्यावर भाजपाने प्रत्युत्तरही दिलं होतं. मात्र आता पुन्हा एकदा योगी चर्चेत आले आहेत. एका ज्येष्ठ पत्रकाराने लिहिलेल्या पुस्तकात अनेक दावे करण्यात आलेत. ज्यात २०२२ विधानसभा निवडणुकीत योगी आदित्यनाथ यांना हटवण्याची तयारी झाली होती असं म्हटलं आहे.
ज्येष्ठ पत्रकार श्यामलाल यादव यांच्या At The Heart of Power - The Chieft Ministers of Uttar Pradesh हे पुस्तक समोर आलं आहे. त्यात लिहिलंय की, उत्तर प्रदेशात २०२२ च्या विधानसभा निवडणुकीला केवळ ९ महिने बाकी होते. त्यावेळी लखनौपासून दिल्लीपर्यंत भाजपा आणि आरएसएस नेत्यांमध्ये अनेक बैठका झाल्या. त्यावेळी योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्याचं ठरवलं गेले. मात्र नेतृत्वात बदल करण्याआधीच भाजपा पक्षश्रेष्ठींना जाणीव झाली की जर कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच योगींना मुख्यमंत्रिपदावरून हटवलं तर त्याचा पक्षाला फटका बसू शकतो.
श्यामलाल यादव यांनी त्यांच्या पुस्तकात योगींना CM पदावरून हटवण्यामागची कारणे सांगितली नाहीत. परंतु मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविषयी लिहिलेल्या १६ पानांमध्ये योगी सरकारविरोधात ज्या काही गोष्टी सुरू होत्या त्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्या काळात केशव प्रसाद मौर्य यांच्यासोबत योगी आदित्यनाथ यांचे संबंध ताणले होते. संघ नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे २२ जून २०२१ ला योगी आदित्यनाथ अचानक केशव प्रसाद मौर्य यांना भेटण्यासाठी पोहचले होते.
या भेटीतून दोन्ही नेत्यांमधील दुरावा कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय हे दाखवण्यात आलं. २०१६ मध्ये केशव प्रसाद मौर्य राज्यात प्रदेशाध्यक्ष बनले होते. त्यानंतर २०१७ ला भाजपाने यूपीत दमदार यश मिळवलं. या विजयानंतर मुख्यमंत्रिपदासाठी केशव प्रसाद मौर्य यांच्या नावाची चर्चा सर्वात आघाडीवर होती. परंतु अचानक योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री बनवण्यात आलं. तेव्हापासून या दोन्ही नेत्यांमध्ये मतभेद सुरू झाले होते.