११५ गावांमधील ते ५०० वर्षांनंतर घालतील पगडी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 08:13 AM2024-01-18T08:13:26+5:302024-01-18T08:13:46+5:30
गेली ५०० वर्षे ते पगडी घालत नव्हते, त्याचे कारणही प्रभू रामांशीच जुळलेले आहे.
अयोध्या : अयोध्येतील भव्यदिव्य मंदिरात प्रभू श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर अयोध्या परिसरातील ११५ गावांमधील ठाकूर (क्षत्रिय) समाजातील लोक पगडी घालतील. गेली ५०० वर्षे ते पगडी घालत नव्हते, त्याचे कारणही प्रभू रामांशीच जुळलेले आहे.
शरयू नदीच्या तीरावरील ही गावे आहेत. हे लोक स्वत:ला प्रभू रामांचे वंशज मानतात. ५०० वर्षांपूर्वीच्या त्यांच्या पूर्वजांनी अशी शपथ घेतली होती की, ते अयोध्येत जन्मभूमीच्या ठिकाणी राम मंदिर बनणार नाही तोवर पगडी आणि चामड्याच्या वहाणा घालणार नाहीत.
असे म्हणतात की, बाबराचा सरसेनापती मीर बांकी याने राम मंदिर उद्ध्वस्त केले. त्यानंतर ठाकूर गजराज सिंह यांनी ९० हजार क्षत्रियांना जमा केले आणि कुलदेवता सूर्य मंदिरात शपथ घेतली की, जोवर प्रभू रामांचे मंदिर उभे राहणार नाही आणि सन्मानाने ते प्राणप्रतिष्ठित होणार नाहीत तोवर ते चामड्याच्या वहाणा आणि पगडी घालणार नाहीत. त्यांनी युद्धही केले, पण हजारो क्षत्रिय मारले गेले. पुढे मीर बांकीने राम जन्मभूमीच्या ठिकाणी मशीद बांधली.
छटा जग पनाही नहींं, और नही बंधी पाग
आता या ११५ गावांमधील क्षत्रिय बांधव २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा होत असताना समारंभपूर्वक पगडी घालतील आणि वहाणाही. त्यावेळी क्षत्रियांनी जी शपथ घेतली ती अशी होती -
जन्मभूमी उद्धार होए,
जा दिन बैरी भाग
छटा जग पनाही नहींं,
और नही बंधी पाग.