ट्रॅक्टर-ट्रॉली नदीत पलटी; ९ जणांचा बुडून मृत्यू, एकाचा शोध सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 05:21 PM2023-08-24T17:21:05+5:302023-08-24T17:22:47+5:30
एका धार्मिक कार्यक्रमाला जाण्यापूर्वी ट्रॅक्टर ट्रॉलीतून हे भाविक जवळच असलेल्या नातेवाईकांना भेटायला गेले होते.
सहरानपूर - उत्तर प्रदेशच्या सहारनपूर येथे भीषण अपघाताची घटना घडली. जिल्ह्यातील ढमोरा नदीत ट्रॅक्टरची ट्रॉली पडून ९ भाविकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. बोंदकी गावातील ही घटना असून घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले आहे. बुधवारी ही घटना घडली असून आज एकूण ९ जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. माजी मुख्यमंत्री आणि बीएसपी सुप्रिमो मायावती यांनी ट्विट करुन घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.
एका धार्मिक कार्यक्रमाला जाण्यापूर्वी ट्रॅक्टर ट्रॉलीतून हे भाविक जवळच असलेल्या नातेवाईकांना भेटायला गेले होते. यावेळी, बोंदकी गावानजीक ढमोरा नदीत त्यांची ट्रॅक्टर ट्रॉली पलटी होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला असून आणखी एक जण बेपत्ता आहे. बेपत्ता व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे.
श्रद्धालुओं से भरी ट्रैक्टर-ट्राली के सहारनपुर जिले के ढमोला नदी में दुर्घटनाग्रस्त हो जाने के कारण उसमें सवार दस लोगों की हुई मौत की खबर अति-दुखद। यूपी सरकार से पीड़ित परिवार वालों की हर प्रकार से मदद की अपील।
— Mayawati (@Mayawati) August 24, 2023
बुधवारी सायंकाळी ही घटना घडली असून दोन महिला आणि २ मुलींच्या मृत्यूची माहिती कालच समोर आली होती. मात्र, आज आणखी ५ जणांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहेत. या ट्रॅक्टर ट्रॉलीतून ४० जण प्रवास करत होते. दरम्यान, मायावती यांनी पीडित घटनेवर दु:ख व्य्क केलं असून युपी सरकारने पीडित कुटुंबीयांना सर्वोतोपरी मदत करण्याचे आवाहनही त्यांनी केलंय.