Traffic: एकाच बाईकवर स्वार होत सहा जण करत होते जीवघेणे स्टंट, पोलिसांनी पकडलं आणि...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2023 03:16 PM2023-06-22T15:16:22+5:302023-06-22T15:17:14+5:30
Stunt on Bike: सध्याच्या काळाता तरुण रस्त्यावरून दुचाकी चालवताना जीवघेणे स्टंट करताना सर्रास दिसतात. असे स्टंट करणारे व्हिडीओ पाहिल्यावर पोलीस अशा स्टंटबाजांना पकडून त्यांच्यावर कारवाई करतात.
सध्याच्या काळाता तरुण रस्त्यावरून दुचाकी चालवताना जीवघेणे स्टंट करताना सर्रास दिसतात. असे स्टंट करणारे व्हिडीओ पाहिल्यावर पोलीस अशा स्टंटबाजांना पकडून त्यांच्यावर कारवाई करतात. मात्र असे जीवघेणे स्टंट करणाऱ्यांचं प्रमाण कमी झालेलं नाही. गाझीयाबाद येथे नुकत्याच घडलेल्या घटनेत एकाच बाईकवर बसून सहा जण धुमाकूळ घालत होते. त्यांच्या बाजूने जाणाऱ्या कुणीतरी त्यांचा व्हिडीओ बनवला. तसेच ते सोशल मीडियावर व्हायरल केले.
जेव्हा हा व्हिडीओ पोलिसांकडे पोहोचला, तेव्हा पोलिसांनी या प्रकाराची दखल घेतली. त्यानंतर या स्टंटबाजांना पकडले आणि त्यांना १९ हजार रुपयांचा दंड ठोठावला. ही घटना गाझियाबादमधील लोनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ट्रॉनिका सिटी क्षेत्रातील आहे. पोलिसांनी सांगितले की, वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई सुरूच राहील. कुणालाही लोकांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार नाही आहे. भविष्यात अशी कुठली घटना घडली तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.
या संपूर्ण प्रकरणात एसडीसीपी (वाहतूक) रामानंद कुशवाहा यांनी सांगितले की, सहा तरुण दुचाकीवर स्टंटबाजी करत असल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळाली. त्यानंतर व्हिडीओवरून दुचाकीस्वारांची ओळख पटवण्यात आली. त्यानंतर दुचाकीचा मालक असलेल्या अमितवर वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याने दंडात्मक कारवाई करण्यात आली.