एकाला वाचवायला गेले अन् ७ जण बुडाले; ५ मृत्यू तर दोघांची प्रकृती चिंताजनक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 09:34 PM2023-06-14T21:34:11+5:302023-06-14T21:34:21+5:30
जोरजोरात आवाज ऐकून आजूबाजूचे लोक घटनास्थळी पोहोचले आणि या सर्वांना बाहेर काढले.
देवरिया - उत्तर प्रदेशच्या देवरियात बुधवारी संध्याकाळी भीषण दुर्घटना घडली. याठिकाणी गंडक नदीत ७ जण बुडाले त्यातील ५ जणांचा मृत्यू झाला असून २ जण गंभीररित्या जखमी आहेत. मृतांमध्ये ३ महिला आणि २ लहान मुलांचा समावेश आहे. या घटनेनंतर नदीघाटापासून मेडिकल कॉलेजपर्यंत लोकांचा गोंधळ उडाला होता.
जिल्हा दंडाधिकारी अखंड प्रताप सिंह, पोलिस अधीक्षक संकल्प शर्मा आणि इतर अधिकाऱ्यांनी मेडिकल कॉलेजमध्ये तातडीने पोहचून पुढील कार्यवाही सुरू केली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सर्व मृतांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तारकुलवा पोलीस स्टेशन हद्दीतील पाचरुखिया गावातील रहिवासी आशिया (४८) पत्नी मजहर, मुलगी मेहमूद, टिंकू अन्सारी मुलगा शहाबुद्दीन, दिलशाद (१२) मुलगा अझरुद्दीन, सकीना (४०) पत्नी शहाबुद्दीन, पलक मुलगी हारुण आणि अयान मुलगा फिरोज हे बुधवारी सायंकाळी गंडक नदीत पोहायला गेले होते. पोहताना दिलशादचा पाय घसरला आणि तो खोल पाण्यात बुडू लागला. दिलशादला बुडताना पाहून इतरांनी त्याला वाचवण्यासाठी खोल पाण्यात पोहचले आणि तेही बुडू लागले.
यावेळी जोरजोरात आवाज ऐकून आजूबाजूचे लोक घटनास्थळी पोहोचले आणि या सर्वांना बाहेर काढले. पोलिसांनी घटनास्थळ गाठत बुडालेल्या सर्वांना उपचारासाठी मेडिकल कॉलेजला पाठवले. जिथे डॉक्टरांनी आशिया पत्नी मजहर, आशिया खातून मुलगी मेहमूद, टिंकू अन्सारी मुलगा शहाबुद्दीन, दिलशाद मुलगा अझरुद्दीन आणि सकीना पत्नी शहाबुद्दीन यांना मृत घोषित केले. अपघातात जखमी झालेल्या पलक आणि अयानवर वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. जिल्हा दंडाधिकारी अखंड प्रताप सिंह, पोलिस अधीक्षक संकल्प शर्मा, एडीएम नागेंद्र सिंह, डीएम सौरभ सिंह सीओ श्रेयस त्रिपाठी आणि इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली.