कर्नाटकात पिछाडी, पण युपीत भाजपला आघाडी; मनपा निवडणुकीत योगींचा करिश्मा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2023 10:49 AM2023-05-13T10:49:35+5:302023-05-13T10:50:39+5:30
उत्तर प्रदेशातील महापालिका निवडणुकांमध्ये महापौर पदाच्या १७ पैकी १६ जागांवर भाजपची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे
दक्षिण भारतातील महत्त्वाचं राज्य असलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकांचा निकाल हाती येत असून काँग्रेसला बहुमताची आघाडी मिळत असल्याचं प्राथमिक निकालातून समोर येत आहे. कर्नाटकमध्ये भाजपला फटका बसला असून भाजपची पिछाडी पाहायला मिळत आहे. कर्नाटकमध्ये पिछाडी असली तरी उत्तर प्रदेशमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत योगींचा करिश्मा कायम असल्याचे दिसून येत आहे. येथील महापालिका निवडणुकांमध्ये भाजपला मोठं यश मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे.
उत्तर प्रदेशातील महापालिका निवडणुकांमध्ये महापौर पदाच्या १७ पैकी १६ जागांवर भाजपची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. येथे समाजवादी पक्षाला पुन्हा एकदा सपाटून मार खावा लागत असल्याचं दिसत आहे. युपीत ४ आणि ११ मे रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदान झाले होते. या निवडणुकीत १७ महापौर, १४२० महापालिका नगरसेवक १९९ नगराध्यक्ष, नगरपालिका सदस्य (नगरसेवक) ५३२७, ५४४ नगरपंचायत अध्यक्ष आणि ग्रामपंयातीच्या ७१७८ जागांसाठी मतदान पार पडले आहे.
युपीतील गाझियाबादच्या महापौर निवडणुकीत भाजपचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. भाजप उमेदवार सुनिता दयाल ह्या १२ हजार मतांनी आघाडीवर आहेत. तर, एकूण १७ पैकी १६ जागांवर भाजप उमेदवार आघाडीवर आहेत. केवळ एकाच जागेवर समाजवादी पक्षाचा उमेदवार आघाडीवर आहे. येथील नगरपालिका निवडणुकीतही भाजपला यश मिळताना दिसून येत आहे. येथे १९९ पैकी ७८ जागांचे अपडेट हाती आले असून ३० जागांवर भाजप तर २७ जागांवर सपा आणि इतर उमेदवार १२ जांगावर आघाडी घेऊन आहेत.
युपीतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा करिश्मा कायम असल्याचं दिसून येत आहे. भाजपला येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठं यश मिळत आहे.