योगींनी सांगितला PDA चा अर्थ, अखिलेश यांना टोमणा अन् 'सपा'च्या आमदारांनाही हसू अनावर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2024 06:11 PM2024-02-07T18:11:25+5:302024-02-07T18:13:03+5:30
उत्तर प्रदेशच्या विधानसभेत आज काहीसे वेगळे चित्र पाहायला मिळाले.
UP Assembly Budget Session: उत्तर प्रदेशच्या विधानसभेत आज काहीसे वेगळे चित्र पाहायला मिळाले. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. यादरम्यान योगींनी शिवपाल यादव यांचे नाव घेऊन समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यांचाही समाचार घेतला. योगी म्हणाले की आमचे उपमुख्यमंत्री म्हणाले होते की, त्यांचा पीडीए म्हणजे परिवार डेवलपमेंट अथॉरिटी आहे. त्यांच्या PDA मध्ये इतर लोक आहेत पण काका शिवपाल यादव तिथे नसल्यामुळे त्यांची नेहमी फसवणूक होते. न्याय कधी मिळणार यासाठी एकदा महाभारत वाचा.
खरं तर योगी आदित्यनाथ यांच्या या विधानंतर सभागृहात एकच हशा पिकला. भाजपा आमदारांसह समाजवादी पार्टीच्या आमदारांना देखील हसू अनावर झाले. 'सपा'च्या लोकांनी प्रभू श्रीरामावर विश्वास ठेवला असता तर ते आपल्या काकांना विसरले नसते, असेही योगींनी नमूद केले.
योगी यांचा अखिलेश यांना टोमणा
तसेच २०१७ पूर्वी उत्तर प्रदेशवर राज्य करणारे लोक त्यांनी राज्याला कुठे नेले? त्यांनी उत्तर प्रदेशातील लोकांसाठी मोठे संकट निर्माण केले होते. येथील तरुणाईला ओळख लपवण्यास भाग पाडले. येथील तरुण कुठेही गेला तरी त्याला नोकरी मिळत नव्हती. भाड्याच्या खोल्या विसरा, हॉटेल्स, धर्मशाळांमध्येही खोल्या मिळत नव्हत्या. आता उत्तर प्रदेशने २२ जानेवारी २०२४ ची घटना पाहिली आहे, अशा शब्दांत योगींनी अखिलेश यांना लक्ष्य केले.
योगी आदित्यनाथ राम मंदिराबद्दल म्हणाले की, आज प्रत्येकजण दिव्य आणि भव्य अयोध्या पाहून भारावून जात आहे. हे काम खूप आधी व्हायला हवे होते. अयोध्येतील लोकांसाठी विजेची व्यवस्था करता आली असती. तिथे चांगल्या आरोग्य सुविधा पुरवता आल्या असत्या. ही विकासकामे कोणत्या उद्देशाने थांबवली गेली? मी केवळ अयोध्या आणि काशीला गेलो नसून नोएडा आणि बिजनौरला देखील गेलो आहे. तिथे कामे केली आहेत.
अखिलेश यांचा सरकारला प्रश्न
समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी सरकारला प्रश्न विचारताना म्हटले, "तुम्ही कायदा आणि सुव्यवस्थेबाबत शून्य सहनशीलता म्हणता, मग महिलांवर सर्वाधिक गुन्हे का होत आहेत? सर्वाधिक घटना त्यांच्याविरुद्ध का होत आहेत? देशात गुन्हेगारी वाढत आहे. देशात गुन्हेगारीच्या बाबतीत उत्तर प्रदेश सर्वात आघाडीवर का आहे?"